दहा वर्षांच्या चिमुकलीवर बाप-लेकासह तिघांचा अत्याचार; 'गुड टच, बॅड टच' धड्याने गुन्हा उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:02 PM2024-10-21T16:02:44+5:302024-10-21T16:04:29+5:30
शाळेमध्ये गुड टच, बॅड टच याबद्दल मुलींना शिकवत असताना उघडकीस आली घटना; तीनही आरोपींना पोलिसांकडून अटक
नेकनूर : चिकनचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या चिमुकलीवर बाप-लेकासह तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात नेकनूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेच तीनही आरोपींना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आलेली आहे. अत्याचाराची ही घटना ३ ऑगस्टपूर्वी घडलेली आहे. परंतु आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्या पीडित मुलीने झालेला प्रकार कोणालाही सांगितला नाही.
राजेंद्र रामलिंग चंदनशिवे, सागर राजेंद्र चंदनशिवे (रा. वंजारवाडी, ह. मु. चौसाळा) व आशिफ कुमार चौधरी उर्फ कल्लू (नेपाळी, ह.मु वाशी) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी बाहेरगावी शिकायला असते. तेथील शाळेमध्ये गुड टच, बॅड टच याबद्दल मुलींना शिकवले जात होते. शिक्षिका मुलींना शाळेत शिकवत असताना पीडित मुलगी अचानक रडू लागली. ती रडत असल्याने शिक्षिकेने तिला जवळ घेत विश्वासाने विचारले. त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. तिला १०० रुपयांचे चिकन आणून देतो, असे म्हणून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच तिने झालेला प्रकार कोणाला सांगू नाही, म्हणून तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडित मुलीने झालेली घटना मनातच ठेवली होती.
ही संपूर्ण घटना शिक्षिकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच आई-वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने नेकनूर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना पकडून बेड्या ठोकल्या. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी व पोलिस उपनिरीक्षक शेळके हे करत आहेत.
नेपाळी चालवतो चायनीज गाडा
आशिफ कुमार याचा चौसाळ्यात चायनीजचा गाडा आहे. तर सागर व राजेंद्र चंदनशीव हे बापलेक मजुरी करतात. या तिघांचीही एकमेकांसोबत ओळख होती. त्यांनी १० वर्षांच्या मुलीला आमिष दाखविले आणि तिच्याच जुन्या घरी नेत अत्याचार केला.