भरधाव टेम्पोने पाठीमागून धडक देत दुचाकीस १ किमी फरफटत नेलं; एकाचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 11:50 AM2023-04-20T11:50:05+5:302023-04-20T11:50:18+5:30
भरधाव टेम्पोने पाठीमागून धडक देत दुचाकी जवळपास एक किलोमीटर फरफटत नेली.
दिंद्रुड (बीड) : भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक देत जवळपास एक किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, दिंद्रुड येथील अशोक पांडुरंग ठोंबरे (32) याचे दिंद्रुडपासून जवळ बेलोरा फाट्यावर खाजगी दुकान आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजेदरम्यान दुकान बंद करून अशोक ठोंबरे आणि दुकानात काम करणारा हमाल कांतीलाल खिराडे (रा.खुंदरी जि बडवाणी,मध्यप्रदेश) दुचाकीवरून घराकडे येत होते. दरम्यान, बीड-परळी महामार्गावरील सरस्वती नदीच्या पुलावर एका भरधाव टेम्पोने ( एमएच 14 के ए 9315) पाठीमागून दुचाकीला धडक दिली. यामुळे अशोक ठोंबरे खाली पडले तर टेम्पोने कांतीलालसह दुचाकी जवळपास एक किलोमीटर फरफटत नेली.
यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अशोक ठोंबरे यास माजलगाव येथे प्रथमोपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर कांतीलाल खिराडे यावर अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.