धोकादायक वळणावर कार पुलावरून कोसळली; व्यापाऱ्याचा मृत्यू, कुटुंबातील तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 02:00 PM2022-11-02T14:00:33+5:302022-11-02T14:01:57+5:30
राजस्थानवरून परतणाऱ्या जामखेड येथील व्यापारी कुटुंबावर काळाचा घाला
- अविनाश कदम
आष्टी ( बीड) : जामखेड-बीड-अहमदनगर महामार्गावर आज सकाळी पोखरी गावाजवळील धोकादायक वळणावर पुलावरून कार कोसळून भीषण अपघात झाला. यात जामखेड येथील व्यापारी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून महेंद्र बोरा ( ५८ ) यांचा मृत्यू झाला. तर बोरा कुटुंबातील अन्य तिघे गंभीर जखमी असून एकजण किरकोळ जखमी आहे.
जामखेड शहरातील भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा कुटुंबासमवेत राजस्थानला देवदर्शनाला गेले होते. मंगळवारी रात्री विमानाने बोरा कुटुंब पुणे विमानतळावर आले. तेथून स्वतःच्या कारने (एम. एच.१६ ए. टी ८८०७ ) सर्वजण आज पहाटे जामखेडकडे निघाले होते. दरम्यान, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हरला पोखरीजवळ सोडून बोरा यांचा मुलगा भूषण गाडी चालवत होता. काही अंतर पुढे जाताच धोकादायक वळणावर टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली कार पुलावरून खाली कोसळली.
अपघातात महेंद्र बोरा यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील पत्नी रेखा महेंद्र बोरा (५२), सून जागृती भूषण बोरा ( २८), नात लियाशा भुषण बोरा (६) हे गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक फौजदार नामदेव धनवडे, पोका भरत गुजर, बी. ए. वाणी यांनी भेट देऊन पंचनामा केला. जखमींना तातडीने जामखेड येथे प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी नगरकडे रवाना करण्यात आले. मुलगा भुषण शांतिलाल बोरा ( ३४ ) हा किरकोळ जखमी आहे. दरम्यान, जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर महेंद्र बोरा यांच्यावर सायंकाळी ५ वाजता तपनेश्वर अमरधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.