टोलनाक्यासमोर टाकलेल्या दगडांमुळे कार उलटली, दीड महिन्याच्या बालिकेचा हात तुटून पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 08:13 PM2024-10-19T20:13:25+5:302024-10-19T20:14:25+5:30

भरधाव कार पलटी होऊन पाचजण जखमी झाले आहेत

A car overturned due to stones thrown in front of the toll booth, a one-and-a-half-month-old girl's arm was broken | टोलनाक्यासमोर टाकलेल्या दगडांमुळे कार उलटली, दीड महिन्याच्या बालिकेचा हात तुटून पडला

टोलनाक्यासमोर टाकलेल्या दगडांमुळे कार उलटली, दीड महिन्याच्या बालिकेचा हात तुटून पडला

- मधुकर सिरसट
केज (बीड) :
केज ते मांजरसुंबा महामार्गावर उमरी शिवारातील बंद असलेल्या टोलनाक्याजवळ वळणरस्ता वापरा फलक न लावताच टाकलेल्या सिमेंटच्या मोठ्या गठ्ठु व दगडावरून आदळून एक भरधाव  कार उलटली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडला. अपघातात दीड महिन्याच्या बालिकेचा हात तुटून पडला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील जाधव कुटुंबातील पाच जण कारमधून लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे ( एम एच 20 / जी क्यू 2949) चालकासह प्रवास करीत होते. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान ही कार केज जवळील  साखर कारखान्या समोरून जाणाऱ्या महामार्गाच्या उतारावरून भरधाव वेगात धावत होती. उमरी शिवारात उभारण्यात आलेला टोलनाका अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे नाक्याजवळ सिमेंटचे मोठे गट्टु आणि दगड टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. संबंधित कंपनी एचपीएमने यासाठी कसलाही दिशदर्शक बोर्ड लावला नाही. त्यामुळे भरधाव वेगात धावणारी कार सिमेंटचे गट्टू आणि दगडाच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळून उलटली. 

या भीषण अपघातात गुरूनाथ दत्ता जाधव 33 वर्षे, प्रतिभा नवनाथ जाधव 34 वर्षे, शाहु नवनाथ जाधव 6 वर्षे, दीड महिन्याची शिवानी नवनाथ जाधव हे पाच जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, आनंद शिंदे, जमादार दत्तात्रय बिक्कड, प्रकाश मुंडे, संतोष गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली. केज येथील रुग्णवाहिका चालक संतोष वळसे यांनी घटनास्थळावरून जखमींना केज येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविले. त्यांतनर अधिक उपचारासाठी जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.

दीड महिन्याच्या शिवानीचा हात तुटला....
या अपघातात अवघ्या दीड महिन्याच्या शिवानी नवनाथ जाधव या बालीकेचा उजवा हात दंडापासून तुटून बाजुला पडला होता. हे दृष्य पाहून थरकाप उडत होता. भरधाव वेगातील कार उलटल्याने कारच्या इंजिनच्या अक्षरा ठिकऱ्या उडाल्या. या जखमींपैकी दीड महिन्याची शिवानी नवनाथ जाधव, शाहू नवनाथ जाधव (11)  आणि या दोन्ही बालकांची आई प्रतिभा नवनाथ जाधव (34) या तिघांवर सर्जिकल अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे अधिष्ठाता डॉ. राकेश जाधव यांनी सांगितले. 

अपघात घडताच रस्ता केला खुला
या अपघाताची माहिती होताच एचपीएम कंपनीने शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील सर्व अडथळा दूर करुन वाहनांसाठी महामार्ग खुला केला, अशी माहिती कनिष्ठ अभियंता विकास देवळे यांनी दिली.

Web Title: A car overturned due to stones thrown in front of the toll booth, a one-and-a-half-month-old girl's arm was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.