व्हायरल ऑडिओ क्लिपवरून कुंडलिक खांडे, शिवराज बांगर विरोधात परळीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 17:39 IST2024-06-28T17:38:26+5:302024-06-28T17:39:53+5:30
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक कराड यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपवरून कुंडलिक खांडे, शिवराज बांगर विरोधात परळीत गुन्हा दाखल
परळी (बीड): मंत्री धनंजय मुंडे यांच्या विषयी आक्षेपार्ह शब्द वापरलेली ऑडिओ क्लिप जाणीवपूर्वक संगनमताने व्हायरल करून दोन जातीत तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा)चे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्या विरोधात परळीच्या शहर पोलीस ठाण्यात 28 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक कराड यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांची विषयी आक्षेपार्ह शब्द काढून गाडी फोडण्याची भाषा वापरून दोघांच्या सवांदाची ऑडिओ क्लिप व्हायरल करून दोन जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी कुंडलिक खांडे व शिवराज बांगर या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे हे करीत आहेत.