पतसंस्थेच्या कॅशियरला पिस्तुलाचा धाक दाखवून ३९ लाखांची रक्कम लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2024 12:42 PM2024-02-17T12:42:37+5:302024-02-17T12:42:53+5:30
अंबाजोगाईत भरवस्तीत घडलेला प्रकार
- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई (बीड) -: दिवसभराचे कामकाज आटोपून पतसंस्थेत जमा झालेली रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी निघालेल्या कॅशियरला तीन चोरट्यांनी रस्त्यात अडवून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्या जवळील जवळपास ३९ लाख रुपयांची रक्कम लुटल्याची घटना अंबाजोगाईत शुक्रवारी (दि.16) रात्री उशिरा घडली.
सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील प्रख्यात असलेल्या राजर्षी शाहू पतसंस्थेचे कॅशियर गणेश देशमुख हे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दैनंदिन कामकाज आटोपून दिवसभरात जमा झालेली जवळपास ३९ लाख रुपयांची रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सेवकासोबत दुचाकीवरून निघाले होते. ते मुकुंदराज कॉलनीत आले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या तिघा चोरटय़ांनी त्यांना अडविले. स्वतः जवळील पिस्तूल काढून त्यांनी ती देशमुख यांच्या डोक्याला लावली. पिस्तूल आणि त्यासोबत चाकूचा धाक दाखवून त्यांनी देशमुख यांच्याकडील ३९ लाख रुपये रक्कम ठेवलेली बॅग घेतली आणि पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, भर वस्तीत घडलेल्या या घटनेने शहरात
खळबळ उडाली आहे.