शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना पाठबंधारेचा क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By सोमनाथ खताळ | Published: May 22, 2024 07:17 PM2024-05-22T19:17:21+5:302024-05-22T19:18:02+5:30

तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याच्या परवानगीसाठी घेतली लाच

A class one officer of irrigation dept arrested by ACB while taking bribe of 28 thousand from farmer | शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना पाठबंधारेचा क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना पाठबंधारेचा क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

बीड : गलेलठ्ठ पगार असतानाही माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळी येथील कार्यकारी अभियंत्याने सात शेतकऱ्यांकडून २८ हजार रुपयांची लाच मागितली. तीच स्वीकारताना त्याला त्याच्याच कक्षात बीडच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.

राजेश आनंदराव सलगरकर (वय ३५, ह.मु. रा. अंबाजोगाई, मूळ मिरज, जि. सांगली) हा परळी येथील माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. तो वर्ग १ चा अधिकारी आहे. तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील इतर पाच शेतकऱ्यांचे मौजे चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याची परवानगी मिळावी, यासाठी कार्यकारी अभियंता यांच्याकडे अर्ज केला होता. ती देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये याप्रमाणे सात जणांचे ३५ हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीअंती प्रत्येकी चार हजार रुपये याप्रमाणे २८ हजार रुपये घेण्याचे ठरले. 

याची तक्रार एसीबीकडे येताच त्यांनी बुधवारी खात्री केली. त्यानंतर सापळा लावला. सलगरकर याने स्वत: आपल्या कक्षातच हे २८ हजार रुपये घेतले. या वेळी त्याला लगेच बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याविरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, अविनाश गवळी, भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे आदींनी केली.

एकाच दिवशी दोन कारवाया
बीडमध्येही नगररचनाकार प्रशांत डाेंगरे याच्यासह नेहाल शेख आणि नीलेश पवार या दोन खासगी अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑनलाइन अर्जाला मंजुरी देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील १५ हजार रुपये घेण्याचे निष्पन्न झाले. यामध्ये नेहाल व नीलेश यांना बेड्या ठोकल्या असून डोंगरे फरार आहे. या सर्वांविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: A class one officer of irrigation dept arrested by ACB while taking bribe of 28 thousand from farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.