एका हातात चहाचा कप, दुसऱ्या हातात नोटा; पोलीस उपनिरीक्षकासह अंमलदार लाचेच्या सापळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 12:16 PM2022-12-06T12:16:44+5:302022-12-06T12:17:45+5:30

औरंगाबादच्या पथकाची बीडमध्ये कारवाई, शिवाजीनगर ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास रंगेहाथ पकडले.

A cup of tea in one hand, money in the other; An police officer with a sub-inspector in a bribery trap at Beed | एका हातात चहाचा कप, दुसऱ्या हातात नोटा; पोलीस उपनिरीक्षकासह अंमलदार लाचेच्या सापळ्यात

एका हातात चहाचा कप, दुसऱ्या हातात नोटा; पोलीस उपनिरीक्षकासह अंमलदार लाचेच्या सापळ्यात

googlenewsNext

बीड : विनयभंगाच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणी करुन २५ हजार रुपयांची तडजोड केली. त्यातील १० हजार स्वीकारले, उर्वरित १५ हजार रुपयांची लाच घेताना शिवाजीनगर ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबादेतील पथकाने शहरातील बसस्थानकासमोर एका हॉटेलात ५ डिसेंबरला रात्री साडेआठ वाजता ही कारवाई केली. उपनिरीक्षक राजू भानुदास गायकवाड व अंमलदार विकास सर्जेराव यमगर अशी त्यांची नावे आहेत. 

राजू गायकवाड यांना चार महिन्यांपूर्वीच ग्रेड उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली होेती. ते शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत आहेत. १७ ऑक्टोबरला शिवाजीनगर ठाण्यात तक्रारदारावर विनयभंगाचा गुन्हा नाेंद आहे. हे प्रकरण ब फायनल करण्यासाठी उपनिरीक्षक राजू गायकवाड व त्यांचे लेखनिक अंमलदार विकास यमगर यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी दहा हजार रुपये स्वीकारले होते. उर्वरित रकमेची मागणी झाली, पण तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

यानंतर औरंगाबादच्या पथकाने ५ डिसेंबरला बसस्थानकासमोरील हॉटेलातलाचमागणी पडताळणी केली, यात तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारण्याचे उपनिरीक्षक गायकवाड व अंमलदार यमगर यांनी मान्य केले. चहा घेत असतानाच तक्रारदाराकडून उर्वरित १५ हजार रुपये गायकवाड यांनी स्वीकारले. त्यानंतर एसीबी पथकाने झडप मारून दोघांनाही पकडले. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. औरंगाबाद एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, प्रभारी अपर अधीक्षक दिलीप साबळे, उपअधीक्षक जी. पी. गांगुर्डे, अंमलदार दिगांबर पाठक, भीमराज जिवडे, शिरीष वाघ, चालक चांगदेव बागुल यांनी ही कारवाई केली. या कारवाईने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

ड्युटी संपेपर्यंत वाट पाहिली...
तक्रारदार हे शासकीय कर्मचारी असून ५ डिसेंबरला ते ड्युटीवर होते. इकडे उपनिरीक्षक राजू गायकवाड हे ठाण्यात कर्तव्यावर होते, तर अंमलदार विकास यमगर निवडणूक कामाच्या ड्युटीवर होते. सायंकाळी पाच वाजेनंतर त्या तिघांची बसस्थानकासमोरील हॉटेलात भेट ठरली. औरंगाबादचे पथक सकाळीच बीडमध्ये पोहोचले होते. लाच मागणी व सापळा यशस्वी व्हावा, यासाठी पथकाने तिघांचीही ड्युटी संपेपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर सापळा यशस्वी करूनच पथक औरंगाबादला परतले.

Web Title: A cup of tea in one hand, money in the other; An police officer with a sub-inspector in a bribery trap at Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.