शेतकऱ्याचे घर भरदिवसा फोडले; ११ तोळे सोन्यासह रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 07:42 PM2022-12-19T19:42:30+5:302022-12-19T19:42:41+5:30
शेतकरी शेतात गेल्याची संधी साधत केली चोरी
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याचे घर भरदिवसा फोडल्याची घटना शनिवारी दुपारी पारगाव येथे घडली होती. चोरट्यांनी ११ तोळे सोने आणि ४५ हजार रोख असा एकूण २ लाख ८१ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
आष्टी तालुक्यातील पारगांव जोगेश्वरी येथील शेतकरी संतोष ज्ञानदेव कदम शनिवारी घराला कुलूप लावून हे पत्नीसह शेतात गेले होते. याच दरम्यान घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील पोटमाळ्यावर बॅगमध्ये ठेवलेले ११ तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोख ४५ हजार असा एकूण २ लाख ८१ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी रविवारी संतोष ज्ञानदेव कदम यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.