१० महिन्यांत दाम दुप्पटचा फंडा; ५४ लाखांची फसवणूक; रिद्धीसिद्धी फायनान्सने गाशा गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 02:20 PM2023-07-28T14:20:00+5:302023-07-28T14:20:19+5:30

या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातीलच गुंतवणूकदारांची मोठी संख्या आहे.

A fund that doubles in value in 10 months; 54 lakhs fraud, Riddhisiddhi Finance has wrapped up | १० महिन्यांत दाम दुप्पटचा फंडा; ५४ लाखांची फसवणूक; रिद्धीसिद्धी फायनान्सने गाशा गुंडाळला

१० महिन्यांत दाम दुप्पटचा फंडा; ५४ लाखांची फसवणूक; रिद्धीसिद्धी फायनान्सने गाशा गुंडाळला

googlenewsNext

अंबाजोगाई : सुरुवातीला काही लोकांना गुंतवणुक केल्यास १० महिन्यात पैसे डबल होण्याची स्कीम सांगितली. त्यानंतर त्यांना ठरल्याप्रमाणे परतावाही दिला. यावर विश्वास बसल्याने  परतावा मिळालेल्या गुंतवणुकदारांनी स्वतः मित्र, नातेवाईक आदींना स्कीमबद्दल माहिती दिली. कुठलीही जाहिरात न करता दहा वीस गुंतवणुकदारांचा आकडा काही काळातच चारशे ते पाचशेवर जावून पोहचला. लाखों रुपये जमा झाल्यानंतर रिद्धीसिद्धी फायनान्स कंपनीने आपला गाशा गुंडाळत सर्वांनाच मोठा झटका दिला. आज-उद्या पैसे मिळतील या अपेक्षेने गुंतवणुकदारांनी वाट पाहिली मात्र फसवणुकच झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसात धाव घेतली. या प्रकरणी रिद्धी सिद्धीच्या सर्व संचालकांवर अंबाजोगाई शहर पोलीसात गुरुवारी ५३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

कांचन राहुल वाघमारे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामेश्वर ओंकार कुरुळे (रा.लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई) यांनी शॉपवर सतत येवून ओळख केली. त्यानंतर रिध्दी सिध्दी फायनानशियल सर्व्हिसेसचा व्यवसाय आहे. यामध्ये माझे साथीदार प्रभाकर श्रीकृष्ण हजारे, नम्रता खरात मिळून ट्रेडींग, पोल्ट्री फार्म, गोठ फार्म, मच्छी व्यवसाय, मैत्रीचा चहा, माऊली वडेवाले याचबरोबर जमिनीची खरेदी विक्री असे व्यवसाय करतो. यात तुम्ही १० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा महिन्यात डबल देऊ शकतो. यासाठी तुम्ही एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास २० हजार रुपये महिन्याप्रमाणे दहा महिन्यात तुमच्या खात्यात किंवा रोखीने पैसे देईल, असे अमिष दाखवले. त्यानंतर ५० हजार रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. 

गुंतवणूक करण्याचे ठरल्यानंतर अॅड. शिवाजी ज्ञानोबा जोगदंड यांच्याकडे १०० रुपयांच्या बाँडवर रक्कम व व्यवहाराचा उल्लेख करुन रोख ५० हजार रुपये साक्षीदार प्रभाकर हजारे यांच्याकडे दिले. त्यांनी पुढील दहामहिन्यानंतरच्या तारखेचा एक लाख रुपयांचा एचडीएफसी बँकेचा धनादेश दिला. त्यांनी बोलल्याप्रमाणे १० महीने खात्यावर ९ हजार ५०० रुपये प्रमाणे पुर्ण रक्कम मिळाली. विश्वास बसल्याने या स्कीमबद्दल मैत्रीणीला सांगितले. तिनेही गुंतवणूक केली. तसेच पुन्हा रोख ३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र त्यानंतर कुठलाही परतावा मिळाला नाही. वारंवार परतावा देण्याच्या तारखा दिल्या, मात्र रक्कम मिळाली नाही. अशा पद्धतीने अनेकांची ५३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीत  यांची नावे
या आर्थिक घोटाळ्यात रामेश्वर ओंकार करुळे, मिना ओंकार कुरुळे, ओंकार कुरुळे, शिवप्रसाद कुरुळे, नम्रता खरात (सर्व रा. लोखंडी सावरगाव, ता.अंबाजोगाई) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व फरार असून अधिक तपास निरीक्षक विनोद घोळवे करत आहेत.

गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे होणार वर्ग
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातीलच गुंतवणूकदारांची मोठी संख्या आहे. त्यामुळे प्राथमिक तपास करुन हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Web Title: A fund that doubles in value in 10 months; 54 lakhs fraud, Riddhisiddhi Finance has wrapped up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.