...अन् पंकजाताई लाजून मागे फिरल्या, फडणवीसांना टाळी देत हसल्या; नेमकं काय घडलं?
By मुकेश चव्हाण | Published: December 6, 2023 10:32 AM2023-12-06T10:32:10+5:302023-12-06T10:33:57+5:30
शासन आपल्या दारी या सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानाचा पुढचा टप्पा मंगळवारी बीड जिल्ह्यातील परळी येथे पार पडला.
शासन आपल्या दारी या सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानाचा पुढचा टप्पा मंगळवारी बीड जिल्ह्यातील परळी येथे पार पडला. यावेळी बीड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ७४९ कोटींच्या विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे देखील सहाभागी झाल्या होत्या.
सदर कार्यक्रमादरम्यान एक मजेशीर किस्सा घडल्याचे समोर आले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह पंकजा मुंडे व्यासपीठावर बसल्या होत्या. यावेळी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांशी बोलत होते. याचदरम्यान कार्यक्रमातील सूत्रसंचालकांनी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे असं नाव घेत भाषण करण्यास सांगितले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचं आडनाव देखील मुंडे असल्याने देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे यांना भाषणासाठी आमंत्रित केल्यासारखं वाटलं. याचवेळी पंकजा मुंडे खुर्चीवरुन उठून थेट भाषणासाठी पुढे गेल्या. मात्र जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी भाषण सुरु केलं. त्यानंतर पंकजा मुंडेंच्या चूक लक्षात येताच त्या लाजल्या आणि पळत आपल्या खुर्चीवर जाऊन पुन्हा बसल्या. यावेळी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना टाळी देत हसताना दिसले.
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमातून लाईव्ह
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 5, 2023
05-12-2023 📍परळी, बीड https://t.co/PGliE1Mfvn
'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने आतापर्यंत राजकीय विरोधक राहिलेले पालकमंत्री धनंजय मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे हे बहीण भाऊ एकत्र आले. या दोघांनीही असेच एकत्रित रहावे. आम्ही ताकद देऊ, असे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. या दोघांनीही जिल्हाच नव्हे तर राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही ठेवली. मुंडे बहीण-भाऊ एकत्र आल्याने जिल्ह्याला नक्कीच लाभ होईल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना आहे. परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे या परळी विधानसभा मतदारसंघात म्हणाव्या तेवढ्या सक्रिय नाहीत.
मंत्र्यांसह मुंडे बहीण-भावाचा एकत्र प्रवास
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे सर्वजण एकाच हेलिकॉप्टरमध्ये परळीला आले. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात एकत्र येऊन काम केल्यास जिल्ह्याचा विकास होईल, असे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे मुंडे बहीण-भाऊ एकत्रित येऊन बीड जिल्ह्याचा विकास करणार का? या दोघांपैकी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक कोण लढणार? हा प्रश्न आहे. परळी विधानसभा मतदारसंघात मंत्री धनंजय मुंडे यांची यंत्रणा सक्षम असून, ते सातत्याने जनतेच्या संपर्कात आहेत तर पंकजा मुंडे यांनीही आपणच परळीमधून निवडणूक लढविणार असल्याचे यापूर्वी घोषित केले आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक घडामोडी पहायला मिळणार आहेत.