सुटीनंतर सैन्यात पुन्हा रुजू होण्यापूर्वीच भीषण अपघातात जवानाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 03:19 PM2024-01-27T15:19:25+5:302024-01-27T15:20:13+5:30
धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचे एक चाक निखळून पडले होते.
- अजय जोशी
पाटोदा : शहराजवळ शंभर चिरा भागात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता नादुरुस्त टिपरला पाठीमागून दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एका सैन्य जवानाचा जागीच मृत्यू झाला. ज्योतीराम हनुमंत जाधव असे मृत जवानाचे नाव आहे.
जवळा या गावातील ज्योतीराम हनुमंत जाधव सैन्यात जवान म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त ते सुटी घेऊन गावाकडे आले होते. शुक्रवारी रात्रीच ते कामावर पुन्हा रुजू होण्यास निघणार होते. परंतु, पाटोदा शहराकडून शुक्रवारी रात्री गावाकडे परत येताना शंभरचिरा परिसरात रस्त्यात उभ्या नादुरुस्त टिपरवर (एम एच १७ टी२०७३) जाधव यांची दुचाकी ( क्रमांक एम एच२२ एफ ८०६५) धडकली.
या जोरदार धडकेत जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचे एक चाक निखळून पडले होते. जवान जाधव भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर भागात कार्यरत होते. ते काही कामानिमित्त गावाकडे आले होते. ते शुक्रवारीच आपल्या कर्तव्यवर पुन्हा रुजू होण्यास जाणार होते. पंरतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षाची मुलगी, व तीन वर्षाचा मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.