उसाच्या फडातून बिबट्या बाहेर निघाला अन् थरकाप उडाला; शेतकऱ्यांत दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 03:08 PM2024-11-29T15:08:20+5:302024-11-29T15:08:39+5:30
अंबाजोगाई तालुक्यातील पूस आणि जवळगाव शिवारात खळबळ
अंबाजोगाई : शहरालगतच्या बुट्टेनाथ परिसरातील डोंगरदऱ्यांत गेल्या दहा वर्षांपासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे. परंतु बुधवारी बिबट्याने अंबाजोगाई तालुक्यातील पूस आणि जवळगाव शिवारात अचानक आपले दर्शन दिल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई शहरालगत असलेल्या बुट्टेनाथ परिसरातील डोंगरदऱ्यांत गत दहा वर्षांत या भागातील नागरिकांनी अनेकदा बिबट्या पाहिला. या बिबट्याने अनेक वेळा म्हशी, शेळ्यांचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या. तर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावला होता.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
मागील काही वर्षे बिबट्याच्या दर्शनाची चर्चा बंद झाली होती. मात्र बुधवारी रात्री जवळगाव-पूस शिवारात बिबट्या उसाच्या फडातून बाहेर निघतानाचे दृश्य अनेक शेतकऱ्यांनी पाहिले आणि गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
तेलघणा परिसरातही आढळले ठसे !
याच परिसरातील तेलघणा शिवारातही बिबट्याच्या पावलांचे ठसे हरभऱ्याच्या पिकात उमटल्याची चित्रफीत अलीकडेच व्हायरल झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्रत्यक्ष बिबट्यानेच दर्शन दिले असल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यात बालाघाटच्या डोंगरदऱ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या संपूर्ण परिसरात वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. दहा वर्षांपूर्वी बुट्टेनाथ परिसरात जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाने जेरबंद केला होता. यानंतर मात्र येल्डा परिसरात दिसलेल्या बिबट्याला वनविभागाने जाळे लावून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या तावडीतूनदेखील तो सुटला.
बिबट्या पुन्हा सक्रिय !
या घटनेला बराच काळ लोटल्यानंतर पुन्हा एकदा अंबाजोगाई तालुक्यात बिबट्या सक्रिय झाल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी वनविभागाला दूरध्वनीवरून संपर्क साधून बिबट्याच्या वावराची कल्पना दिली. त्यानुसार अंबाजोगाईच्या वनपाल विजया शेंगोटे यांनी त्यांच्या पथकासह पूस व जवळगाव परिसरात जाऊन त्या भागाची पाहणी केली. तसेच तेथील शेतकऱ्यांना भीतीचे कारण नाही, असे सांगून बिबट्या दिसताच वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी दोन्ही गावांतील शेतकऱ्यांना केले आहे.
स्वरक्षणासाठी साहित्य वापरावे
पूस व जवळगाव शिवारात बिबट्याचे पाऊलठसे उमटल्याचे निदर्शनास आले आहे. या भागात बिबट्या असल्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांनी स्वरक्षणासाठी शेतात जाताना कुऱ्हाड, विळा, गोफण, कोयता, काठ्या या वस्तूंचा वापर करावा. तसेच बिबट्या दिसताच वनविभागाशी संपर्क साधावा. -- विजया शिंगोटे, वनपाल, अधिकारी