पीएनबी घोटाळ्याचे धागेदोरे बीडपर्यंत; सीबीआयने शिवपार्वती साखर कारखान्याची केली चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 05:57 AM2023-03-31T05:57:24+5:302023-03-31T05:57:50+5:30
पीएनबीकडून शिवपार्वती साखर कारखान्याला जवळपास १०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते.
बीड : देशात गाजलेल्या पीएनबी (पंजाब नॅशनल बँक) घोटाळ्याचे धागेदोरे बीडपर्यंत पोहोचले असून याच संदर्भाने सीबीआयने गुरुवारी धारूर तालुक्यातील मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखान्याची चौकशी केली. चेअरमन पांडुरंग सोळंके यांच्या मुंगी व परळी येथील घरांचीही झडती घेण्यात आली. काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपण पथकाला सहकार्य केल्याचे सोळंके यांनी सांगितले.
पीएनबीकडून शिवपार्वती साखर कारखान्याला जवळपास १०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. परंतु पुरेसे तारण नसतानाही हे कर्ज दिले कसे, असा प्रश्न आहे. याबाबत चेअरमन सोळंके यांनी सांगितले की, पुणे येथील जी.एस. जमादार या व्यक्तीच्या माध्यमातून डॉ. नंदकुमार तासगावकर यांची ओळख झाली. माझ्याकडून त्यांनी इंग्रजीमध्ये मजकूर असलेल्या शंभरच्या बाँडवर स्वाक्षरी घेतली. त्यानंतर कोठेही स्वाक्षरी नसताना त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून १०० कोटींचे कर्ज घेतले.