मोठा अनर्थ टळला; घाटात ब्रेकफेल झाल्याने टँकर उलटला, इंधन रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 05:52 PM2024-03-30T17:52:47+5:302024-03-30T17:52:59+5:30
आष्टी तालुक्यातील कारखेल येथील घटना
- नितीन कांबळे
कडा (बीड): अहमदनगरवरून डिझेल- पेट्रोल घेऊन बीडकडे निघालेला टँकर शनिवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान बीड- नगर राज्य महामार्गावरील कारखेल येथील घाटात ब्रेकफेल झाल्याने एका घराला धडकून उलटला.
अहमदनगर येथून डिझेल, पेट्रोल घेऊन एक टँकर ( क्रमांक एम.एच ०४,जे.के.७२६ ) बीड-नगर राज्य महामार्गाने बीडला जात होता.
आष्टी तालुक्यातील कारखेल येथील एका वळणावर अचानक ब्रेकफेल झाल्याने चालकाचा ताबा सुटून फुलाजी दगडू घुले यांच्या घराला धडकून उलटला. यात चालक अशोक बाळासाहेब माळी ( रा.चिंचोलीमाळी जि. बीड ) हा नशिब बलवत्तर म्हणून बचावला. टँकरमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. माहिती मिळताच अहमदनगर व आष्टी येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी झाल्या.
अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस हवालदार लुईस पवार, पोलीस अंमलदार अमोल शिरसाठ, सतिश पैठणे, बाळु जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
मोठी दुर्घटना टळली
कारखेल येथील गावात रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणावर लोक असतात. ऊन असल्याने दुपारी रस्त्यावर कोणी नव्हते. जर हीच घटना सकाळी किवा सायंकळच्या दरम्यान घडली असती मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती असे प्रत्यक्षदर्शी नागरिक कैलास घुले यांनी सांगितले.
पेट्रोल-डिझेल एकाच टँकरमध्ये...
अपघातग्रस्त टँकरमध्ये वीस हजार लिटर पेट्रोल व डिझेल आहे. पाच पाच हजार लिटरच्या चार कप्प्यात पेट्रोल-डिझेल एकाच टँकरमध्ये होते.