गूढ आवाजाने बीड शहर हादरले, घाबरू नका; पाणीपातळीतील बदलामुळे आवाज , भूकंपाची नोंद नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 10:36 PM2024-02-06T22:36:17+5:302024-02-06T22:38:22+5:30
भूस्तरातील क्रियेमुळे असा आवाज असावा, परंतू भूकंपसदृष्य नसल्याचे भूवैज्ञानिकांनी सांगितले.
बीड : मंगळवारी रात्री ८ वाजून २२ मिनिटे झालेली असताना संपूर्ण बीड शहर मोठ्या स्वरूपातील गूढ आवाजाने हादरले. चार ते पाच किलोमीटर परिसरात ऐकायला मिळालेला आवाज आणि हादरा कशाचा असेल, याबाबत लोक तर्कवितर्क लढवत होते. दरम्यान भूस्तरातील क्रियेमुळे असा आवाज असावा, परंतू भूकंपसदृष्य नसल्याचे भूवैज्ञानिकांनी सांगितले. तर भूकंपाची कुठेही नोंद नसल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
शहरात रात्री ८:२२ वाजता अचानक मोठा आवाज आला आणि त्याचा हादरा जाणवला. घराच्या खिडक्या, दरवाजे हादरले तर घरातील भांडी प्लास्टिक व हलक्या स्वरूपाचे साहित्य इकडे तिकडे पडले. मोठा आवाज झाल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर फिरल्या.प्रशासनाने कारण कळवावे, अशाही पोस्ट पडत होत्या. त्याचबरोबर नागरीक पोलिस, तहसील प्रशासन, जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनशी संपर्क करून विचारणा करत होते. दरम्यान तहसीलदारांनी लातूरच्या भूकंप पुनर्वसन केंद्राला याबाबत माहिती कळविली.