नर्सला शिवीगाळ, शिपायालाही मारहाण; अंमळनेरचा फार्मासिस्ट निलंबित

By सोमनाथ खताळ | Published: June 1, 2024 03:36 PM2024-06-01T15:36:10+5:302024-06-01T15:36:50+5:30

बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कारवाई

A nurse was abused, even a soldier was beaten; Pharmacist of Amalner suspended | नर्सला शिवीगाळ, शिपायालाही मारहाण; अंमळनेरचा फार्मासिस्ट निलंबित

नर्सला शिवीगाळ, शिपायालाही मारहाण; अंमळनेरचा फार्मासिस्ट निलंबित

बीड : पाटोदा तालुक्यातील अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील फार्मासिस्टने चांगलाच गोंधळ घातला आहे. आपल्याच केंद्रातील नर्सला शिवीगाळ केली. त्यानंतर शिपायालाही बेदम मारहाण केली. औषध भांडारमधील औषधीही ऑनलाइन ठेवल्या नाहीत. याची चौकशी केल्यानंतर दोषी आढळल्याने फार्मासिस्टला निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बुधवारी रात्री उशिरा केली आहे.

अशोक सुबराव पवार असे निलंबित फार्मासिस्टचे नाव आहे. पवार हे नेहमीच वादग्रस्त असतात. यापूर्वीही त्यांनी ओपीडीत जमा झालेली रक्कम शासकीय बँक खात्यात जमा करण्याऐवजी स्वत:साठी वापरली होती. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर त्यांनी ते पैसे भरले. त्यानंतर काही दिवसांतच आपल्याच केंद्रातील एका नर्ससोबत वाद घालून नर्सला शिवीगाळ करण्यासह हातही उचलला. याबाबत नर्सने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. हे प्रकरण शांत होत नाही तोच दोन दिवसांपूर्वी एका शिपायाला शिवीगाळ करत मारहाण केली. हे प्रकरणही पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले. यामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन झाली होती. या सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन पवार यांची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये ते दोषी आढळले. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी पवार यांना निलंबित केले आहे. त्यांना मुख्यालय अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर दिले आहे.

शिरूरच्या लिपिकानेही केला अपहार?
शिरूर तालुक्यातील एका लिपिकानेही वैद्यकीय अधिकारी यांच्या खोट्या स्वाक्षरी करून लाखो रुपयांचा अपहार केला आहे. याचीही चौकशी झाली आहे. परंतु त्याच्यावर कारवाई करण्यास आरोग्य विभाग आखडता हात घेत आहे. दरम्यान, हा लिपिक आरोग्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीच उद्धट बोलून अरेरावी करत असल्याचे सांगण्यात आले. तसेच माझ्यावर कारवाई केली तर मी आत्मदहन करेन, अशी धमकीही देत आहे. त्यामुळेच अधिकारी देखील त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी विचार करत असल्याचे दिसते. परंतु अपहार केल्याचे एका चौकशीत समोर आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आता याच्यावर कारवाई होते की, दुर्लक्ष केले जाते? याकडे लक्ष लागले आहे.

फार्मासिस्टला निलंबित केले
अंमळनेरच्या फार्मासिस्टबद्दल तक्रारी होत्या. याचा अहवाल सीईओ यांना पाठवला होता. संबंधित फार्मासिस्टला निलंबित केले, हे खरे आहे. शिरूरच्या लिपिकाबद्दल आताच बोलणे उचित नाही. वेळेनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ.उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

Web Title: A nurse was abused, even a soldier was beaten; Pharmacist of Amalner suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.