दीड महिन्यांचा बाळाला मुदत संपलेला डोस पाजला; अखेर डॉ. शरद पवारसह एका नर्सवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 03:54 PM2022-12-27T15:54:28+5:302022-12-27T15:56:34+5:30
राजकीय दबाव आणल्याने अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.
माजलगाव (बीड) : येथील पवार हॉस्पीटलमध्ये दीड महिन्याच्या बालकास मुदत संपलेला डोस पाजण्यात आला होता. राजकीय दबापोटी अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी व पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळता करत होते. याप्रकरणी लोकमतने आवाज उठवल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर डॉ. शरद पवार व एका नर्सवर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील पवार हॉटेलमध्ये 7 नोव्हेंबर रोजी शितल आनंद राऊत यांच्या दीड महिन्याच्या मुलीला आठ महिन्यापूर्वी मुदत संपलेला डोस पाजण्यात आला होता. या विरोधात बाळाचे आजोबा अशोक धारक यांनी पवार हॉस्पिटल विरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने चौकशी केली. डॉ. पवार यांनी राजकीय दबाव आणल्याने अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.
याप्रकरणी लोकमतने डॉ. पवारला वाचवणारे संबंधीत विभागाचे अधिकारी व पोलीसांविरोधात आवाज उठवल्यानंतर सोमवारी संध्याकाळी डॉ. शरद पवार व लस देणाऱ्या नर्स सोनाली चंद्रशेन गोरे यांच्याविरुद्ध अन्न व औषधी प्रशासनाचे औषधी निरीक्षक विलास दुसाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हॉस्पिटलमध्ये लसीचा औषधसाठा नोंदवही ठेवण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर लशिबाबतचे रेकॉर्ड ठेवण्यात आलेले नाहीत. यासह अनेक त्रुटी संबंधित तपास अधिकाऱ्यांना आढळून आल्या होत्या.