अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पोलिसाच्या टिप्परने पोलिसालाच उडविले, प्रकृती चिंताजनक
By सोमनाथ खताळ | Published: April 27, 2023 06:11 PM2023-04-27T18:11:48+5:302023-04-27T18:12:18+5:30
बीड शहरातील घटना : वाळू टाकून परत भरधाव वेगात जाताना दुचाकीला दिली धडक
बीड : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने पाेलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक दिली. यात हा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून खासगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज दत आहे. ही घटना गुरूवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास बीड शहरातील नगर नाका येथे घडली. दरम्यान, हे वाळूचे टिप्पर एका पोलिस कर्मचाऱ्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सध्या शिवाजीनगर पोलिसांनी ठाण्यात नेले आहे.
कृष्णा रूपणर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मागील दहा दिवसांपूर्वी रूपनर हे अमरावतीवरून बीडला बदलून आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ते सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. गुरूवारी दुपारी ते जेवणासाठी घरी जात होते. याचवेळी विना क्रमांकाच्या भरधाव आलेल्या टिप्परने रूपनर यांच्या दुचाकीला (एमएच ४४ एक्स ०३७३) धडक दिली. यात पाच ते दहा फुटापर्यंत दुचाकी फरटत नेली. यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यानंतर वाहतूक शाखेचे सहायक फौजदार सोडगिर व त्यांच्या पथकाने त्याला आपल्या वाहनातून रूग्णालयात दाखल केले. रूपनर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. धडक देणारा टिप्पर पोलिसांनी शिवाजीनगर ठाण्यात नेला आहे.
अवैध वाळू वाहतूक कधी थांबणार?
रूपनर यांना धडक दिलेल्या टिप्परमधील वाळू खाली करून ते भरधाव वेगाने मिनी बायपास रोडने जात होते. यातच पोलिस कर्मचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर चालक पसार झाला. दरम्यान, यापूर्वीही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अनेकांचा जीव घेतलेला आहे. आता ही मालिका कधी थांबणार? प्रशासनाला कारवाई करण्यासाठी आणखी किती लोकांचा बळी घ्यायचा आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रकरण मिटविण्यासाठी दबाव
अपघातातील टिप्परवर कसलाही नंबर नसला तरी सूत्रांच्या माहितीनुसार ते पोलीसाचेच असल्याचे सांगण्यात आले. हे प्रकरण वाढू नये, यासाठी जखमी कर्मचाऱ्यावर दबाव आणला जात आहे. गुन्हा दाखल न करता सर्व खर्च देऊ, असे प्रलोभण दिले जात आहे. तसेच एका वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यानेही नियंत्रण कक्षाला हे प्रकरण मिटल्याची नोंद घ्या, असा संदेश दिल्याची माहिती आहे.