गाडी अडविल्यावरून बीडमध्ये भरचौकात शिवीगाळ करून पोलिसाला मारहाण
By सोमनाथ खताळ | Published: March 29, 2023 07:46 PM2023-03-29T19:46:04+5:302023-03-29T19:47:03+5:30
मार्च एन्ड असल्याने शहर वाहतूक पोलिसांकडून वाहनांवरील थकीत दंड वसुलीची माेहीम हाती घेण्यात आली होती.
बीड : गाडी अडविल्याचा राग मनात धरून पोलिस निरीक्षकांना शिवीगाळ तर पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सीसीटीव्ही तपासा, आपण मारहाण केलेली नसून पोलिसांनीच आपल्याला धक्काबुक्की केल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
मार्च एन्ड असल्याने शहर वाहतूक पोलिसांकडून वाहनांवरील थकीत दंड वसुलीची माेहीम हाती घेण्यात आली होती. शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांकडून वाहने अडवून त्यांची तपासणी केली जात होती. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बार्शीकडून आलेल्या एक कार पोलिसांनी अडवली. यावर आमची गाडी का अडवली, असे विचारताच पोलिस व वाहनधारक यांच्यात वादावादी झाली. तोपर्यंत वाहतूककोंडी झाली. याचवेळी पोलिस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार हे तेथे आले. त्यांच्याशीही वाद घातला. पोलिस कर्मचारी महारुद्र डोईफोडे व इतरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहनधारकासह सर्वांनाच पोलिस ठाण्यात नेले. येथे वाद घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. दरम्यान, मारहाण केल्याचा आरोप वाहनधारकाने फेटाळला आहे. तसेच उलट पोलिसांनीच आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोपही संबंधित वाहनधारकाने केला आहे.