ऐन लग्नात करवलीला विंचू चावला अन् तेवढ्यात साडेतीन लाखांचा ऐवज लंपास झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 07:45 PM2022-12-09T19:45:05+5:302022-12-09T19:45:18+5:30
पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच लग्न समारंभात एकच खळबळ उडाली.
- नितीन कांबळे
कडा (बीड) : लग्न समारंभात नवरीला घालण्यासाठी आणलेले सोन्याचे दागिने करवलीजवळ एका पर्समध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, करवलीला अचानक विंचू चावला अन् या गोंधळात साडेतीन लाखांचा ऐवज असणारी पर्स क्षणार्धात लंपास झाल्याची रविवारी घटना घडली होती. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील एकाच गावातील वधुवराचा रविवारी दुपारी विवाह होता. आहेर घेत असताना करवलीला अचानक विंचू चावल्याने गोंधळ उडाला. यात करवलीच्या जवळील खाली पडलेल्या पर्स लंपास झाली. या पर्समध्ये नवरीसाठीचे सोन्याचे दागिने, एक मोबाईल आणि ३ हजार रोख रक्कम होती. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच लग्न समारंभात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या प्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा आष्टी पोलिस ठाण्यात सुरेखा झुंबर चव्हाण ( रा.पिंपरखेड ता.आष्टी ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेद्र पवार करीत आहेत.