वाढदिवशीच समाज कल्याण अधिकाऱ्यास पत्नी-मुलाकडून भररस्त्यात मारहाण
By शिरीष शिंदे | Published: June 13, 2024 06:58 PM2024-06-13T18:58:00+5:302024-06-13T18:58:13+5:30
या प्रकरणी तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बीड : पोटगीचे पैसे का देत नाहीस, असे म्हणत जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी रविकांत शिंदे यांना त्यांच्या मुलासह पत्नीने मारहाण केली. ही घटना बीड शहरातील पाण्याची टाकी परिसरातील भगवान बाबा चौकातील एका दुकानासमोर १० जून रोजी सांयकाळी ६:३० वाजता घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
समाज कल्याण अधिकारी रविकांत शिंदे यांचा १० जून रोजी वाढदिवस होता. त्यामुळे शिंदे हे केक घेण्यासाठी भगवान बाबा चौक परिसरातील एका दुकानात गेले होते. त्यावेळी तेथे शिंदे यांचा मुलगा महेश, पत्नी अनिता व मेहुणा गंगाधर तुकाराम कांबळे हे तिघे तेथे आले. महेश याने रविकांत यांच्या कॉलरला धरून बाहेर काढले. तुम्ही आम्हाला पोटगीचे पैसे का देत नाहीत, असे म्हणून महेश व पत्नी अनिता यांनी मारहाण केली. तसेच तिघांनी मिळून त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महेश रविकांत शिंदे, अनिता रविकांत शिंदे व गंगाधर तुकाराम कांबळे (सर्व रा. राजगृह निवास, टिळकनगर, अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित
समाज कल्याण अधिकारी रविकांत शिंदे यांनी ३ जून रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांना अर्ज केला होता. पत्नी अनिता ही माझ्यापासून विभक्त राहत आहे. अंबाजोगाई येथील न्यायालयामध्ये घटस्फोटाचा अर्ज दिला आहे. मी माझ्या मुलांची शैक्षणिक फीस भरत आहे, तसेच पत्नीस दरमहा खर्च देत आहे. तिचे नातेवाईक माझ्या आईच्या घरामध्ये राहत आहेत व माझ्या आईला घराबाहेर हाकलून दिले आहे. त्यामुळे माझ्या पत्नीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी अर्जात केली आहे.