धारूरच्या चौकात रातोरात उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा, चौथरा बांधून दहा वर्ष लोटले होते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 11:25 AM2024-06-14T11:25:51+5:302024-06-14T11:26:36+5:30
अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होऊन शहराच्या वैभवात भर पडल्याची भावना व्यक्त करत नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.
धारुर ( बीड) : शहरातील मुख्य रस्त्यावरील चौकातील चौथऱ्यावर रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभरण्यात आला आहे. ही घटना आज पहाटे उघडकीस आली. विशेष म्हणजे, मुख्य रस्त्यावरील या चौकात पुतळा उभारण्यासाठी १० वर्षांपूर्वी चौथरा बांधण्यात आला होता. पुतळा उभारण्यात आल्याची वार्ता समजताच नागरिकांनी चौकात एकच गर्दी केली आहे.
ऐतिहासिक किल्ले धारुर शहरातील बस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्ग 548 सी वर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. मागील चाळीस वर्षांपासून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवण्याची मागणी आहे. त्यादृष्टीने येथे नगर परिषदेच्या वतीने दहा वर्षांपूर्वी चौथराही बांधण्यात आला. मात्र, शासकीय नियमावली अन् दप्तर दिरंगाईमुळे अद्यापपर्यंत पुतळा उभारण्यात आलेला नव्हता.
दरम्यान, आज पहाटे चौकातील चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले. रातोरात पुतळा कोणी उभारला हे अद्याप समजू शकले नाही. पुतळा उभारण्यात आल्याची वार्ता शहरात पसरताच चौकात नागरिकांनी गर्दी केली आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होऊन शहराच्या वैभवात भर पडल्याची भावना व्यक्त करत नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.
अचानक पुतळा उभारण्यात आल्याने प्रशासन सक्रिय झाले आहे. पाच ते सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच दुपारी बारा वाजता शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.