"विक्रम बप्पा म्हणाले, तू फाशी घे", तीन वर्षाच्या लेकीसाठी पोस्ट लिहून शिक्षकाची आत्महत्या, बीड हळहळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:00 IST2025-03-15T17:56:24+5:302025-03-15T18:00:36+5:30
Beed Teacher: संतोष देशमुख हत्या आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा चीड आणणारी घटना घडली आहे. एका शिक्षकाने संस्थेतील लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शिक्षकाने आत्महत्येपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती.

"विक्रम बप्पा म्हणाले, तू फाशी घे", तीन वर्षाच्या लेकीसाठी पोस्ट लिहून शिक्षकाची आत्महत्या, बीड हळहळले
Beed Breaking News: "श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही", काळीज पिळवटून टाकणारे हे शब्द आहेत, शिक्षक धनंजय नागरगोजे यांचे! १८ वर्षांपासून शिक्षक म्हणून नोकरी करूनही पगार देत नसल्याने हताश होऊन त्यांनी आत्महत्या केली. बीड जिल्ह्यातील केजमध्ये ही घटना घडली आहे. कृ्ष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेबाहेर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. (Dhananjay Nagargoje News)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धनंजय नागरगोजे हे मागील १८ वर्षांपासून शाळेवर कार्यरत होते. त्यांनी पगार मागितला. त्यावर तू फाशी घे असे उत्तर विक्रम बाबुराव मुंडेंने दिल्याचे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. नागरगोजे यांना तीन वर्षांची मुलगी असून, तिच्यासाठी पोस्ट लिहून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
धनंजय नागरगोजे यांची काळजाचं पाणी करणारी फेसबुक पोस्ट
"श्रावणी बाळा, तुझ्या बापुला शक्य झालंच, तर माफ कर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले; काय करू? माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कुणाला दोन रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही."
श्रावणी, तुझ्या बापूला माफ कर
"श्रावणी बाळा, शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापुला माफ... कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला अजून काही कळत नाही. तुझं वय आहेच किती, तीन वर्षे. तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे, त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला, पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे."
हे मला हाल हाल करू मारणार
"विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हाल हाल करून मारणार आहेत."
"मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झाली काम करतोय अजून मला पगार नाही. आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बप्पा म्हणले, 'तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा'; हे एकूण माझ्या पायाखालची जमीनच सरकली."
श्रावणी मला माफ कर
"आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसांमुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही."
"बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. श्रावणी, मला माफ कर. माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही मी; तरी पण शक्य झालं, जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर. आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला."
सहा जणांमुळे आत्महत्या
"विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवीत आहे. आत्तापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मोठ्या मनानी माफ करावे. सर्वांना माझा शेवटचा राम राम."
आश्रम शाळेवर होते शिक्षक
आत्महत्या केलेले शिक्षक धनंजय अभिमान नागरगोजे, केज तालुक्यातील देवगावचे होते. ते केळगावमधील कायम विनाअनुदानित आश्रम शाळमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गळफास का घेतला हे, अद्याप समोर आलेलं नाही.