पंचायत समितीमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना लाच घेणारा शिक्षक अखेर निलंबित
By अनिल भंडारी | Published: January 25, 2024 01:16 PM2024-01-25T13:16:57+5:302024-01-25T13:17:57+5:30
मग्रारोहयो अंतर्गत गायगोठ्याचे बील मंजूर करून देण्यासाठी घेतली लाच
बीड : पंचायत समितीमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना एका प्रकरणात लाच घेतल्याप्रकरणी अटकेची कारवाई झालेल्या गेवराई तालुक्यातील शिक्षक अमोल रामराव आतकरे यास निलंबित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली.
गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी केंद्रांतर्गत टेंभीतांडा जिल्हा परिषद शाळेत अमोल आतकरे हे शिक्षक आहेत. ते गेवराई पंचायत समितीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. दरम्यान मग्रारोहयो अंतर्गत गायगोठ्याचे बील मंजूर करून देण्यासाठी गेवराई येथील जि. प. शाळेच्या कार्यालयात दोन हजार रूपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात १३ डिसेंबर रोजी पकडले होते. या प्रकरणात त्यांना १४ डिसेंबर रोजी अटक झाली होती व १८ डिसेंबर रोजी जामिनावर मुक्तता झाली होती. ४८ तासांपेक्षा जास्त काळ अभिरक्षेत ते स्थानबध्द होते.
याबाबतचा अहवाल गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर शिक्षक अमोल आतकरे यांची कृती महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियमांचा भंग करणारी असल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील कलम ३(२) मधील तरतुदीनुसार सीईओ पाठक यांनी अमोल आतकरे यांना १४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश २३ जानेवारी रोजी दिले. निलंबन काळात त्यांना आष्टी पंचायत समितीचे गटशिक्षण कार्यालय मुख्यालय राहील, असे आदेशात म्हटले आहे.