बीड लोकसभेच्या मैदानात होऊ शकते तिरंगी लढत; वंचित उमेदवार देणार का?
By अनिल भंडारी | Published: April 2, 2024 12:12 PM2024-04-02T12:12:35+5:302024-04-02T12:13:08+5:30
भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचे जिल्ह्यात दौरे सुरू, ‘मविआ’कडून अद्याप घोषणा नाही
बीड : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांनी रणांगणावर लढण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषित केली असली तरी अद्याप महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा केलेली नाही. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचेही सूर जुळण्याची शक्यता नाही. ही परिस्थिती कायम राहिली तर बीड लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. दोन टर्म त्या खासदार राहिल्या. परंतु यावेळच्या निवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी घोषित केली. परंतु भाजपविरोधात महाविकास आघाडीकडून १ एप्रिलपर्यंत उमेदवार निश्चित अथवा जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळू शकते, असा कयास लावला जात होता. यातच शिवसंग्रामच्या ज्योती विनायक मेटे यांनीही शरद पवार, जयंत पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली. परंतु उमेदवारीबाबत अद्याप निर्णय बाकी आहे.
दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात समेट झालेला नाही. सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्यास वंचित तयार आहे, परंतु त्या बदल्यात काँग्रेसला अकोल्यासाठी समर्थन मागणार नसल्याची भूमिका ‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली आहे. एकंदर परिस्थितीवरून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरल्यानंतर बीडच्या राजकीय मैदानात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार मैदानात उतरविला जाऊ शकतो. जर तसे झाले तर या मतदारसंघात तिरंगी लढत होऊ शकते, असे मानले जात आहे.
गत लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे, रा. काँ. पक्षाचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव या प्रमुख उमेदवारांत लढत झाली होती. शिवाय, पाच अपक्ष, एचबीपी व एक एमएएचकेआरएसचे उमेदवार होते. या निवडणूक निकालानुसार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ९२ हजार १३९ मते मिळाली होती. मागील पाच वर्षांत ‘वंचित’चे वाढलेले संघटन, मतदारसंघातील व राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता जर ‘वंचित’चा उमेदवार मैदानात आला तर लढतीची चुरस वाढू शकते, अर्थात उमेदवार कोण येतो, यावरही तितकेच अवलंबून आहे.
२०१९ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निकाल
प्रीतम गोपीनाथ मुंडे- भाजप- ६,७८,१७५
बजरंग मनोहर सोनवणे- राकाँपा- ५०९८०७
प्रा. विष्णू जाधव - वंचित ब. आघाडी- ९२,१३९
संपत रामसिंग चव्हाण- अपक्ष- १६,७४२
मुजीब नैमुद्दीन इनामदार- अपक्ष- ६,१५२
राजेशकुमार भातगले- अपक्ष- ३,८९७
जगताप नीलेश मुरलीधर- अपक्ष- ३,४८५
विजय रंगनाथ साळवे- अपक्ष- ३,४५७
अशोक भागुजी थोरात- एचबीपी- ३,३५१
गणेश नवनाथ करांडे- एमएएचकेआरएस- २,७६१
नोटा--- २,५००