अंधारात उभ्या ट्रकवर धडकली दुचाकी, तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 06:03 PM2022-12-12T18:03:36+5:302022-12-12T18:04:57+5:30
गाडी उभी केल्यानंतर ट्रकचे इंडिकेटर किंवा पार्किंग लाईट चालकाने सुरु नव्हती ठेवली.
नांदेड: रस्त्यात उभ्या ट्रकवर दुचाकी धडकून एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री नांदेड ते उस्माननगर रस्त्यावरील बाभुळगाव पाटीजवळ घडली.बाबूराव भगवान गजभारे असे मृताचे नाव आहे. ट्रकची पाठीमागील पार्किंग लाईट सुरु नव्हती यामुळे दुचाकीस्वारास अंधारात अंदाज न आल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे.
नांदेडच्या सिडको वसाहती शेजारील गोपाळचावडी येथील बाबूराव भगवान गजभारे रविवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून (एमएच-२६, ई- ६६२०) नांदेड ते उस्माननगर प्रवास करत होता. बाभुळगाव पाटीजवळ एक ट्रक ( एमएच-१४, सीपी-७५९९) उभा होता. मात्र, ट्रकचे इंडिकेटर किंवा पार्किंग लाईट चालकाने सुरु नव्हती ठेवली. यामुळे पाठीमागून येणाऱ्या बाबुरावला अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी ट्रकवर धडकली. यात बाबूरावला डोक्यास जबर मार लागला. नातेवाईकांनी अधिक उपचाराकरिता विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून बाबुरावला मृत घोषित केल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार लक्ष्मण सूर्यवंशी व मदतनीस महिला अंमलदार अश्विनी मस्के यांनी दिली. याप्रकरणी रामदास भगवान गजभारे (रा. गोपाळचावडी ता.जि. नांदेड) ने दिलेल्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व पोलीस अंमलदार भगवान गिते हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, १२ डिसेंबर रोजी सकाळी गोपाळचावडी येथील स्मशानभूमीत बाबूराव गजभारे यांच्या पार्थिव देहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.