विधवा महिलेचा उदरनिर्वाह हिरावला; अज्ञात प्राण्याने १० शेळ्यांचा पाडला फडशा, ३ बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 12:38 PM2022-10-19T12:38:29+5:302022-10-19T12:39:13+5:30
पतीचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर पत्नीने उदरनिर्वाहासाठी १३ शेळ्या घेतल्या होत्या.
- नितीन कांबळे
कडा (बीड) : अचानक अज्ञात वन्यप्राण्यांनी हल्ला चढवत दहा शेळ्या फस्त केल्याची घटना आष्टी तालुक्यातील हाजीपुर येथे मंगळवारी रात्री घडली. तसेच तीन शेळ्या अद्याप बेपत्ता आहेत. अरूणा बापू सापते या विधवा महिलेच्या मालकीच्या या शेळ्या होत्या. त्यांचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून होता.
आष्टी तालुक्यातील हाजीपुर येथील बापु सापते यांचे कोरोनात निधन झाले. त्यानंतर दोन मुली, एक मुलगा यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी अरूणा सापते यांच्यावर आली. उदरनिर्वाहसाठी १३ शेळ्या त्यांनी विकत घेतल्या होत्या. मंगळवारी नेहमीप्रमाणे अरुणा सापते आपल्या शेतात शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेल्या. सायकांळी सहा वाजेच्या सुमारास अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला चढवून दहा शेळ्यांचा फडशा पाडला. तर तीन शेळ्यांचा अद्याप शोध लागला नाही.
ऐन दिवाळीच्या तोंडावर विधवा महिलेच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरवले सापते कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हाजिपुरचे सरपंच बबन शेकडे यांनी केली आहे. भाळवणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. सुनिल गदादे, डाॅ.संदिप गायकवाड शवविच्छेदन केले. शेळ्या मृत होण्याचे कारण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच समजेल असे तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ.मंगेश ढेरे यांनी सांगितले.