वीटभट्टीवर मजूर महिलेचा पदर मशिनमध्ये अडकला, गळ्याला फास बसून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 05:16 PM2024-04-29T17:16:01+5:302024-04-29T17:16:25+5:30
आष्टी तालुक्यातील केरूळ येथील घटना
- नितीन कांबळे
कडा- वीटभट्टीवर चिखल कालवण्याच्या मशिनमध्ये माती टाकताना पदर अडकल्याने मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना केरूळ येथे आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. शांताबाई जयदेव जाधव ( ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील मांडवा येथील जयदेव जाधव हे पत्नी शांताबाईसह मागील दोन वर्षांपासून केरूळ येथे एका वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतात. आज सकाळी चिखल तयार करण्याच्या मशिनमध्ये माती टाकत असताना शांताबाई यांचा पदर अचानक मशिनमध्ये अडकला. यामुळे फास बसल्याने शांताबाई गंभीर झाल्या. अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात शांताबाई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.
मागील वर्षी गेला होता चिमुकल्याचा जीव
याच वीटभट्टीवर मागील वर्षी वाळूज येथील मजूराचा चार वर्षाचा मुलगा खेळत असताना अचानक टॅक्ट्ररच्या टायरखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.