भाऊबीजेची ओवाळणी अर्धवट राहिली; पुण्याहून गावाकडे निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 01:02 PM2022-10-27T13:02:47+5:302022-10-27T13:04:13+5:30
आष्टी तालुक्यात चार दिवसात दुसरी घटना
- नितीन कांबळे
कडा ( बीड): भाऊबीजसाठी पुण्याहून आपल्या गावाकडे मोटारसायकलवर जात असताना आष्टी तालुक्यातील चिंचपूरजवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेसातच्या दरम्यान घडली. तर दुचाकीवरील एकाला अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दिवाळी निमित्त पुण्यावरून गावाकडे जात असतांना आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळील वळणावर बुधवार २६ रोजी राञी साडेसातच्या सुमारास अज्ञात वाहनाने पाठिमागून धडक दिल्याने मोटार सायकल (एमएच 12 पीएक्स 6728 ) यावरील आदेश किसन काळे (वय 32) रा.सोनेगांव,धनेगांव ता.जामखेड हा जागीच ठार झाला आहे. तर नवनाथ मच्छिंद्र काळे (36, रा.मोशी,ता.हावेली,जि.पुणे ) हा गंभीर जखमी झाला असून अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पो.हे.काॅ.विकास राठोड यांनी पंचनामा केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली राठोड हे करत आहेत.
चार दिवसातील दुसरी घटना
गेल्या चार दिवसापुर्वीच पुण्यावरून परभणी येथे दिवाळी साठी जात असलेल्या तरूणांचा आष्टी तालुक्यातील बाळेवाडी फाटा येथे अपघात होऊन मृत्यू झाला होता.या घटनेला चार दिवस होते ना होतेच आज पुन्हा दुसरी घटना घडली आहे.या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.