भाजपा पदाधिकाऱ्यावर दबा धरून बसलेल्या तरुणाचे कोयत्याचे वार, हत्येने बीड जिल्हा हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:31 IST2025-04-15T15:31:01+5:302025-04-15T15:31:46+5:30
कोयत्याने वार करून खून केल्यानंतर आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

भाजपा पदाधिकाऱ्यावर दबा धरून बसलेल्या तरुणाचे कोयत्याचे वार, हत्येने बीड जिल्हा हादरला
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव ( बीड) : शहरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरात मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका युवकाच्या खुनाच्या घटनेने माजलगाव शहरासह बीड जिल्हा हादरला आहे. बाबासाहेब प्रभाकर आगे ( रा. किट्टी आडगाव) असे मृताचे नाव आहे. ते भाजपाचे माजलगाव तालुका सरचिटणीस होते. दरम्यान, आरोपी नारायण शंकर फपाळ याने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याची आल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहिती नुसार, आज दुपारी माजलगाव शहरातील शाहू नगर भागात भाजपा कार्यालय आहे. येथे आज दुपारी तालुका सरचिटणीस बाबासाहेब आगे कामानिमित्त आले होते. काम आटोपून बाहेर पडताच तेथे दबा धरून बसलेल्या नारायण शंकर फपाळ याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. बचावासाठी आगे पुढे पळाले तेव्हा फपाळ याने पाठलाग केला. जिवाच्या आकांताने पुढे पळणाऱ्या आगे यांना स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर फपाळ याने गाठले. त्यानंतर फपाळ याने आगे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
प्रत्यक्षदर्शीनुसार फपाळ याने अगोदर आगे यांच्या पोटात वार करून दोन वार डोक्यात केले. त्यानंतर फपाळ तेथून पसार झाला. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली. पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी बाबासाहेब आगे यांना गंभीर जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी आगे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट
दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी नारायण शंकर फपाळ पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. त्याने आगे यांचा खून का केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, भर दिवसा रस्त्यावर हत्येच्या थरारक घटनेने माजलगाव शहरासह बीड जिल्हा हादरला आहे.