बहिणीच्या घरी आहेर घेऊन निघालेल्या तरुणाला कंटेनरने चिरडले; दुचाकीवर लिहिले होते शेवटी नशीब...
By संजय तिपाले | Published: August 15, 2022 01:05 AM2022-08-15T01:05:10+5:302022-08-15T01:07:24+5:30
स्थानिकांच्या मदतीने पाेलिसांनी कंटेनर पकडला. चालक पसार असून क्लिनर ताब्यात आहे.
बीड - पाटोदा- मांजरसुंबा महामार्गावर १४ ऑगस्ट रोजी सकाळी कार-टेम्पो अपघातात सहा जणांचा बळी गेला, याच मार्गावर ससेवाडी फाट्यावर सायंकाळी बहिणीला आहेर घेऊन निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाला कंटेनरने चिरडले. दुचाकीच्या मागे शेवटी नशीब.... असे वाक्य लिहिले होते, घटनेला साजेशा या वाक्याने उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.
मुकींदा पवार (३०,रा. हिंगणी हवेली, ता. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांची बहीण खंडाळा (ता.बीड) येथे राहते. भाच्याचे १६ ऑगस्ट रोजी लग्न ठरले होते. त्यासाठी मुकींदा पवार हा १४ ऑगस्ट रोजी दुचाकीवरुन ( एमएच ४२ एडी. ९६६५) आहेर घेऊन खंडाळ्याकडे जात होता. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला ससेवाडी फाट्यावर भरधाव कंटेनरने ( एमएच ४६ बी. ४६८) समोरासमोर जोराची धडक दिली. यात मुकींद पवार जागीच ठार झाले. लिंबागणेश चौकीचे व महामार्ग केंद्र मांजरसुंबा येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर, स्थानिकांच्या मदतीने पाेलिसांनी कंटेनर पकडला. चालक पसार असून क्लिनर ताब्यात आहे. या घटनेने लग्नसोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले आहे. लग्नात भाच्यामागे मुकींदा पवार हे मामा म्हणून उभा राहणार होते. मात्र, त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने नातेवाईक शाेकमग्न झाले होते.