बीड जिल्ह्यातील ४० हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडच नाहीत !
By अनिल भंडारी | Published: March 19, 2024 05:59 PM2024-03-19T17:59:55+5:302024-03-19T18:00:49+5:30
शाळांचे दुर्लक्ष : आधार-यूडायसची माहिती जुळणे आवश्यक
बीड : जिल्ह्यातील ४० हजार ८४ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिड नसल्याची माहिती मिळाली असून खासगी अनुदानित शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष यानिमित्ताने समोर आले आहे. ३१ मार्चपर्यंत आधार व्हॅलिड न केल्यास १ एप्रिलपासून संबंधित विद्यार्थ्यांना आता शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्याच्या वित्त विभागाने याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत.
शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ११ मे २०२२ रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचाां डेटाबेस तयार करून तो आधारशी संलग्नीकृत करण्यात यावा. तसेच पोषण आहार योजनेंतर्गत महिला व बाल विकास, शालेय शिक्षण व क्रीडा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी विकास आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागांनी पोषण आहाराशी संबंधित सर्व लाभार्थ्यांची नावे आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करूनच संबंधित योजनांना निधी वितरित करण्यात यावा, असे या निर्णयात म्हटले होते.
१ एप्रिलपासून मिळणार नाहीत लाभ
शासनाच्या विविध विभागातील वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभधारक, लाभार्थींचे आधार कार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही शंभर टक्के ३१ मार्च २०२४ पर्यंत करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत. ही कार्यवाही शंभर टक्के करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या सचिवांवर राहणार असून शंभर टक्के कार्यवाहीनंतर हमीपत्र सादर करावे लागणार आहे. आधार कार्ड व्हॅलीडची कार्यवाही शंभर टक्के न झाल्यास संबंधित योजनांचा निधी १ एप्रिल २०२४ पासून वितरित करण्यात येणार नसल्याचे या निर्णयात म्हटले आहे.
व्हॅलिड कसे समजायचे?
आधार कार्डवरील नाव, जन्मतारखेत चूक किंवा नावातील स्पेलिंगमध्ये चूक असली तर ते आधार कार्ड इनव्हॅलिड ठरते. त्यामुळे आवश्यक कार्यवाही शाळांना करावी लागणार आहे. आधारवरील स्पष्ट नोंद शाळांनीयू-डायसमधील माहितीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय आधार व्हॅलिड समजले जात नाही.
आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्येवरच अनुदान
जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या ४० हजार ८४ विद्यार्थ्यांचे आधार असलेतरी ते व्हॅलिड नसल्याची बाब समोर आली आहे. तर १५०६४ विद्यार्थ्यांची नावे आहेत, परंतु त्यांचे आधारकार्डच जोडलेले नाहीत. आधार व्हॅलिड विद्यार्थीसंख्येवरच यापुढे शाळांना अनुदान मिळणार आहे.
कार्यवाही पूर्ण झाली नाही
शासनाने दिलेल्या मुदतीत ३१ डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत व त्यानंतर आजपर्यंत आधार कार्डशी संलग्न करण्याची (आधार व्हॅलीड) कार्यवाही शंभर टक्के पूर्ण झाली नाही. त्यामुळे वित्त विभागाने ४ मार्च रोजी यासंदर्भात आदेश दिले.
खासगी शाळांत इनव्हॅलिडचे प्रमाण जास्त
खासगी अनुदानित शाळा-१८४७४
जिल्हा परिषद शाळा ८१३८
स्वयंअर्थ साहय्यित शाळा - ६९८०