बीड जिल्हा पोलीस दलातर्फे शुक्रवारी ‘आॅकेथॉन’चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:54 PM2019-12-04T23:54:37+5:302019-12-04T23:57:41+5:30
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्या प्रकरणामुळे जिल्हाभरात तणावाचे वातावरण होते. २७ वर्षानंतर परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे ६ डिसेंबर या दिवशी सर्व समाजात एकोपा आणि सलोखा रहावा यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘युनिटीथॉन’ या ‘आॅकेथॉन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बीड : ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्या प्रकरणामुळे जिल्हाभरात तणावाचे वातावरण होते. २७ वर्षानंतर परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे ६ डिसेंबर या दिवशी सर्व समाजात एकोपा आणि सलोखा रहावा यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘युनिटीथॉन’ या ‘आॅकेथॉन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
६ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते १० वाजण्याच्या दरम्यान शहरातील छत्रपती संभाजी महाराज मैदान (मल्टीपर्पज) येथे कार्यक्रम होणार आहे. ७ वाजता आॅकेथॉनला सुरुवात होऊन सहभागी नागरिक चालत बशीरगंज, राजुरी वेस, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, साठे चौक मार्गे पुन्हा मैदानावर येणार आहेत. आॅकेथॉनच्या सुरुवातीला १९९२ साली पात्रूड येथे झालेल्या दंगलीत शहीद झालेले फौजदार साहेबराव राजाराम बाबर यांचे कुटुंबीय हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी विविध संघटना व मंडळांचा प्रमाणपत्रे व रोपटे देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे. यावेळी विविध धर्माचे धर्मगुरु सर्वांना मार्गदर्शन करुन एकोपा टिकवण्यासाठी आवाहन करणार आहेत. अयोध्या निकालानंतर बीड जिल्ह्यातील नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनुचित प्रकार घडू दिला नाही. तसेच नागरिकांनी विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवून सर्वांगीण विकास करण्यास मदत केली आहे. हीच भावना कायम ठेवत नागरिकांनी या आॅकेथॉन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले आहे.
गणेश मंडळांना पुरस्कार
गणेशोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था ज्या मंडळांनी अबाधित राखली व पोलीस प्रशासनास सहकार्य केले तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले अशा जिल्हाभरातील गणपती मंडळांना जिल्हा पोलीस दलातर्फे पुरस्कार देण्यात येणार होते. परंतु निवडणूक व इतर काही कामांमुळे ते लांबणीवर पडले. हा कार्यक्रम आॅकेथॉन रॅलीनंतर छत्रपती संभाजी महाराज मैदानावर होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.