बीडमध्ये ‘एरार’चा एसपी आॅफिसमध्ये ‘थरार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:54 AM2018-05-12T00:54:26+5:302018-05-12T00:54:26+5:30
बीड बसस्थानकात मुलीची छेड काढली, तिला कत्तीची भीती दाखवली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने धावत पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. नशेत असलेला अट्टल गुन्हेगार एरार (अब्दुल रहेमान) यानेही तिचा पाठलाग केला. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाने थांबविण्याचा प्रयत्न करताच त्याच्यावर कत्तीने प्राणघातक हल्ला केला. २० मिनिटे चाललेला हा एरारचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बसस्थानकात मुलीची छेड काढली, तिला कत्तीची भीती दाखवली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने धावत पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. नशेत असलेला अट्टल गुन्हेगार एरार (अब्दुल रहेमान) यानेही तिचा पाठलाग केला. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाने थांबविण्याचा प्रयत्न करताच त्याच्यावर कत्तीने प्राणघातक हल्ला केला. २० मिनिटे चाललेला हा एरारचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडला. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
एरार हा अट्टल गुन्हेगार आहे. चोऱ्या, लुटमार, छेड काढणे यासारखे गुन्हे त्याच्यावर बीड शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्यामुळे त्याची शहरात दहशत आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एरार हा कत्तीसारखे धारदार शस्त्र घेऊन बसस्थानकात गेला. यावेळी तो नशेत होता. येथे एका मुलीची त्याने छेड काढली. तिला हत्यार दाखवून दबाव निर्माण केला. भीतीपोटी पीडित मुलगी शिवाजीनगर ठाण्याच्या दिशेने धावत सुटली.
यावेळी एरारनेही तिचा पाठलाग केला. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एरार तिला गाठण्याच्या प्रयत्नात होता. याचवेळी पीडितेने शिवाजीनगर ठाण्यात न जाता एसपी आॅफिसमध्ये धाव घेतली. एरारही कार्यालयात पोहचला. सुरक्षारक्षक सुनील कोळेकर यांनी त्याला अडवले. यावेळी त्याने आपल्या हातातील कत्तीने त्यांच्यावर वार केला. परंतु कोळेकर यांनी प्रसंगावधान राखत हा वार हातावर झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला जखम झाली. थोडा आरडाओरडा झाल्याने नियंत्रण कक्षात असणारे पोलीस उपनिरीक्षक डिगीकर, एएसआय धांडे, हवालदार गव्हाणे व आगरकर हे ही बाहेर आले.
प्रकार पाहताच त्यांनी एरारला पकडण्याचा प्रत्यन केला. परंतु नशेतील एरारने पोलिसांना पाहताच बाजुला असलेली फुलाची कुंडी उचलत पोलिसांच्या दिशेने भिरकावली. पोलिसांनी ती चुकवल्याने बाजूलाच असलेल्या काचावर लागून काच फुटली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर एरारने हातातील कत्ती कार्यालयातच टाकून देत तेथून पळ काढला.
दरम्यान, जखमी कोळेकर यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. कोळेकर यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात एरार विरुद्ध ३०७, ३५३, ३३२ भादंविसह कलम ४/२७ भाहका प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
पात्रूड गल्लीत ठोकल्या बेड्या
एरारने अधीक्षक कार्यालयातून पळ काढल्यानंतर ही माहिती पोलिसांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, बीड शहर, शिवाजीनगर व पेठ बीड पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी त्याच्या शोधार्थ रवाना झाले. दीड तासानंतर तो पात्रूड गल्लीत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्याला पात्रूड गल्लीत सापळा रचून बेड्या ठोकण्यात आल्या. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान व इतरांनी ही कारवाई केली.
‘एरार’वर विनयभंगाचा गुन्हा दाखल
आई पुण्यावरुन येणार असल्याने पीडित मुलगी व तिची बहीण आईला घेण्यासाठी बीड बसस्थानक परिसरात आल्या होत्या. याचवेळी एरार तेथे आला व मुलीची छेड काढू लागली. एका दुकानदाराने त्याला हटकले. यावेळी त्याने पीडितेला मारहाण करुन तिला धारदार शस्त्राचा धाक दाखवला. तेथून पीडितेने एरारला चापट मारुन सुटका करीत पोलीस ठाण्याच्या दिशेने धाव घेतली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात एरारविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोउपनि रफियोद्दीन शेख हे करीत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना मारहाण
जिल्हा रुग्णालयात गर्दीचा फायदा घेऊन रुग्णांच्या नातेवाईकाचा मोबाईल चोरताना आरसीपीच्या जवानांनी एरारला रंगेहाथ पकडले होते. यावेळी त्याने पोलीस चौकीतील काचा हाताने व डोक्याने फोडल्या होत्या. आपल्याला पोलिसांनीच मारहाण केल्याचा आरोप त्याने केला होता. पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने जुमानले नाही. उलट पोलिसांनाच धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना आहे.
‘मला सोडा, एखाद्याला तरी खल्लास करतो’ पोलिसांनी एरारला पकडल्यानंतर ‘मला सोडा, एखाद्याला तरी खल्लास करतो’ असे म्हणत अधिकारी व कर्मचाºयांच्या हाताला झटका देत त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयातून पळ काढला.