आरोग्याची वारी! चक्कर आली, पाय मुरगळला अन् लगेच धावले आरोग्यातील देवमाणूस
By सोमनाथ खताळ | Published: July 9, 2024 12:09 PM2024-07-09T12:09:28+5:302024-07-09T12:10:25+5:30
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी; नऊ दिवसांत ४ लाख वारकऱ्यांवर उपचार
बीड : पंढरीच्या वाटेने चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाने 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' ही मोहीम राबवली आहे. मागील ९ दिवसांत ४ लाख १४ हजार ३९६ वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. पाय मुरगळला, चक्कर आली की आरोग्यातील डॉक्टर, कर्मचारी हे देव बनून सेवा देत आहेत.
राज्यातील एक हजार दिंड्यांमध्ये सहभागी होऊन १२ लाख ४१ हजार वारकरी हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' ही मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार केला असून ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी वारकऱ्यांची सेवा करत आहेत.
तात्पुरत्या रुग्णालयातून २३२७ रुग्णांवर उपचार
पालखी किंवा दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी ५ खाटांचे तात्पुरते आयसीयू तयार केले आहे. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात. आतापर्यंत २ हजार ३२७ वारकऱ्यांना ॲडमिट करून सेवा दिली आहे.
'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. आतापर्यंत ४ लाख १४ हजार वारकऱ्यांनी रुग्णांना सेवा दिली आहे. २३२७ रुग्णांना तात्पुरते रुग्णालय व जवळच्या संस्थेत ॲडमिट करून उपचार केले. वारकऱ्यांची सेवा करताना मनस्वी आनंद होत आहे. नोडल अधिकारी म्हणून संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.
- डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक आरोग्य सेवा पुणे
कोणत्या पालखीतील वारकऱ्यांची सेवा
पालखीचे नाव - बाह्यरुग्ण संख्या - अंतररुग्ण संख्या
श्री संत गजानन महाराज मंदिर - १३१४० - ५९
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर - १२३५- ४
श्री संत मुक्ताबाई मुक्ताईनगर - ३८०६ - ०
श्री संत निवृत्तीनाथ महाराज - १४२६८ - ६०
श्री संत जनार्धन स्वामी - १८० - ०
श्री संत ज्ञानेश्वर महाराज - २१२४२४ - ९३९
श्री संत तुकाराम महाराज - १४४९४४ - १२५०
श्री संत मुक्ताबाई मेहून - ३०७४ - १
श्री संत एकनाथ महाराज पैठण - १९३१ - ३
श्री संत नामदेव महाराज - २६१८ - २
श्री संत सोपानकाका महाराज - १०१२० - ७
श्री संत निळोबाराय महाराज - ९४१ - २
इतर दिंडी - ८७० - ०
१०८ रुग्णवाहिका - २५१८ - ०
एकूण - ४१२०६९ - २३२७