अबब ! माजलगाव पंचायत समितीत २० पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:20+5:302021-08-26T04:35:20+5:30
माजलगाव : येथील पंचायत समितीमध्ये एकूण १२३ पदे असताना तब्बल २० पदे रिक्त असून, बांधकामाच्या देखरेखीखाली असलेल्या अभियंत्यांच्या तीनही ...
माजलगाव : येथील पंचायत समितीमध्ये एकूण १२३ पदे असताना तब्बल २० पदे रिक्त असून, बांधकामाच्या देखरेखीखाली असलेल्या अभियंत्यांच्या तीनही जागा रिकाम्या आहेत. विविध राजकीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या दबावाखाली कामे करावी लागतात, असा समज असल्याने या ठिकाणी काम करण्यास अभियंते नाखूश असल्याने पदभार स्वीकारत नाहीत अशी चर्चा आहे.
येथील पंचायत समितीअंतर्गत माजलगाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामसेवकांसह एकूण १२३ पदे येथे मंजूर आहेत. यामध्ये ग्रामसेवकांची ५८ पदे मंजूर असताना सद्य:स्थितीत ५४ ग्रामसेवक कार्यरत आहेत, तर ग्रामविकास अधिकारी १० पदे असताना ८ ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. कनिष्ठ सहायकाची १० पदे असून २ पदे रिक्त आहेत. आरोग्य विस्तार अधिकारी एक पद असून ते रिक्त आहे. ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्तीचे काम सतत सुरू असते. मात्र, ते काम करणारे यांत्रिकीची तिन्ही पदे व मदतनिसांची दोन्ही पदे रिक्त असल्याने हे युनिट अधू झाले आहे. वीज तांत्रिकीचे असलेले एकमेव पद रिक्त आहे. सेवकांच्या ६ पदांपैकी ४ पदे रिक्त असल्याने केवळ दोन सेवकांवर समितीचा कारभार हाकावा लागत आहे.
अतिरिक्त कामांचा ताण
पंचायत समितीमध्ये विविध पदे रिक्त असल्याने याचा पदभार त्याला, त्या गावचा पदभार याला अशा पद्धतीने पंचायत समितीत कारभार सुरू असून, रिक्त पदांमुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.