अबब! दररोज लागताेय सव्वादोन कोटी लिटर प्राणवायू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:34 AM2021-04-20T04:34:57+5:302021-04-20T04:34:57+5:30

सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच ऑक्सिजनचीही मागणी वाढली आहे. जिल्ह्यात दररोज तब्बल ...

Abb! Twelve crore liters of oxygen is required daily | अबब! दररोज लागताेय सव्वादोन कोटी लिटर प्राणवायू

अबब! दररोज लागताेय सव्वादोन कोटी लिटर प्राणवायू

Next

सोमनाथ खताळ

बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच ऑक्सिजनचीही मागणी वाढली आहे. जिल्ह्यात दररोज तब्बल २ कोटी २५ लाख लिटर ऑक्सिजन लागत असल्याचे समोर आले आहे. एवढा ऑक्सिजन जमा करताना आता आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाचीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी जिल्हाभरात १२८० रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. रोज हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळतात. यातील १० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. या लोकांना ऑक्सिजनपु रवठा करण्यासाठी यंत्रणा धावपळ करीत आहे. सोमवारी जिल्हाभरात ३ हजार २२६ जंबो सिलिंडर लागले. एका सिलिंडरमध्ये ७ हजार लिटर ऑक्सिजन असते. त्याप्रमाणे तब्बल २ कोटी २५ लाख ७९ हजार २० लिटर ऑक्सिजनची मागणी करण्यात आली होती. रोज एवढ्या ऑक्सिजनची निर्मिती आणि त्याचा पुरवठा करताना यंत्रणाच ऑक्सिजनवर राहत असल्याचे दिसते.

दरम्यान, जिल्हा रुग्णालय, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, लोखंडी सावरगावचे दोन शासकीय रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्येच जास्त ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन लिक्विड व सिलिंडरची जुळवाजुळव करून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी धावपळ करीत आहे. रुग्णांचे हाल होणार नाहीत, यासाठी त्यांच्याकडून योग्य नियोजन केले जात आहे.

ऑक्सिजन कमी करण्यासाठी यंत्रणा वॉर्डात

ज्या रुग्णांना ऑक्सिजनची जास्त गरज नाही, त्याची गती कमी करण्यासह सौम्य लक्षणे असणाऱ्यांना डिस्चार्ज देण्यासाठी अधिकारी रात्रभर कोरोना वॉर्डात फिरत होते. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सचिन आंधळकर आदी पहाटेपर्यंत वॉर्डात होते. नंतर डॉ. राठोड यांनी ऑक्सिजन प्लांटवर जाऊन पुरवठ्याबाबत आढावा घेतला.

पाणी कमी अन् ऑक्सिजन जास्त

जिल्हा रुग्णालयात रोज ७९० जम्बो सिलिंडरची आवश्यकता भासत आहे. म्हणजे रोज ५५ लाख २९ हजार लिटर ऑक्सिजन लागते, तर दिवसभरात २० हजार लिटर पाणीही पुरेसे होते. पाण्यापेक्षा जास्त ऑक्सिजनची मागणी असल्याचे दिसून येत आहे.

लिक्विड संपले, सिलिंडरही अपुरे

जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट लिक्विड संपल्याने रविवारी रात्रीपासून बंद आहे, तसेच खाजगी दोन संस्थांनाही लिक्विड मिळत नाही. बीडला पुणे, औरंगाबाद आणि लातूरहून लिक्विडचा पुरवठा होता. मागणी केली असली तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच कोविड सेंटर वाढल्याने ऑक्सिजननिर्मिती होत असली तरी ते पोहोचविण्यासाठी रिकामे सिलिंडरच नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अन् नातेवाईक अंगावर धावले

ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने आवश्यकता नसलेल्या रुग्णांचा ऑक्सिजन कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांसह अधिकारी काेरोना वॉर्डामध्ये गेले. त्यांनी ऑक्सिजन कमी करताच काही नातेवाईक त्यांच्या अंगावर धावले, तर काहींनी अधिकारी पुढे गेले की मागे ऑक्सिजनची स्पीड वाढविल्याचा प्रकार घडला. काहींनी ऑक्सिजन सुरू ठेवून तोंडाचे मास्क बाजूला काढले होते. असे प्रकार वारंवार घडत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोट

जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट लिक्विड संपल्याने बंद आहे, हे खरे आहे. सध्या दोन खाजगी संस्थांमधून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे; परंतु जास्त सेंटर वाढल्याने मागणी वाढली असून, पुरवठा कमी पडत आहे, तसेच लिक्विडचा तुटवडा जाणवत असून, औरंगाबाद, पुणे आणि लातूरला मागणी केली आहे.

रामेश्वर डोईफोडे, औषध निरीक्षक, बीड

----

अशी आहे आकडेवारी

जिल्ह्यातील शासकीय व खाजगी एकूण कोविड सेंटर ९३

ऑक्सिजनची मागणी - २ कोटी २५ लाख ७९ हजार २०० लिटर

एकूण जंबो सिलिंडर ३२२६

ऑक्सिजनवरील एकूण रुग्ण १२८०

एनआयव्ही/बायपॅपवरील रुग्ण ११७

व्हेंटिलेटरवरील रुग्ण १५

===Photopath===

190421\19_2_bed_9_19042021_14.jpeg~190421\19_2_bed_8_19042021_14.jpeg

===Caption===

सोमवारी दिवसभर वाहनांमध्ये भरून जंबो सिलेंडर जिल्हा रूग्णालयात पोहचविले जात होते.~एकाचवेळी सहा ते आठ जंबो सिलेंडरद्वारे वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरविला जातो. असे जवळपास पाच ठिकाणी पॉईंट केलेले आहेत.

Web Title: Abb! Twelve crore liters of oxygen is required daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.