बीड जिल्हा रुग्णालयात दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी शस्त्रक्रिया; प्रत्येक गुरुवारी सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 11:44 PM2020-02-16T23:44:38+5:302020-02-16T23:45:04+5:30
जिल्हा रुग्णालयात आता प्रत्येक गुरूवारी दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. ही सुविधा उपलब्ध केल्याने रुग्णांचा खर्चासह वेळ आणि त्रासही कमी होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
बीड : जिल्हा रुग्णालयात आता प्रत्येक गुरूवारी दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. ही सुविधा उपलब्ध केल्याने रुग्णांचा खर्चासह वेळ आणि त्रासही कमी होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात मागील काही दिवसांपासून काही सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचा फायदा सामान्यांना होताना दिसून येत आहे. त्यातच आणखी एक भर पडली आहे.
३० जानेवारीपासून औरंगाबाद व शिर्डी येथील डॉक्टरांच्या मदतीने बीडच्या चमूने गर्भपिशवीची पहिली शस्त्रक्रिया दुर्बिणद्वारे केली. ३० जानेवारी रोजी एक, ३ व १३ फेब्रुवारीला दोन अशा पाच शस्त्रक्रिया आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. आता याचा प्रचार व प्रसार होण्यास सुरूवात झाली असून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या महिलांना शस्त्रक्रिया करावयाची आहे, तिच्या संपूर्ण तपासण्या करून घेतल्या जातील. अगोदर एक किंवा दोन दिवसाने शस्त्रक्रियाबाबत माहिती दिली जाईल. त्यानंतर दाखल प्रत्येक गुरूवारी या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विनोद भिवसाने, डॉ.नितीन घोरपडे, डॉ.नारायण गाडे, डॉ.राजश्री शिंदे, डॉ.अर्जुन तांदळे, डॉ. सय्यद शाफे, डॉ. श्रीकांत मोराळे, डॉ.सुनील मस्तुद, डॉ. उज्ज्वला शिंदे, शस्त्रक्रिया गृह प्रमुख जयश्री उबाळे, नीता लांबोरे आदींच्या चमूने या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.
खाजगी रुग्णालयात येतो ६० हजार रूपयांवर खर्च
खाजगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करावयाची झाल्यास ६० हजार रूपयांपेक्षा जास्त खर्च येतो. जिल्हा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया जन आरोग्य योजना अथवा मोफत अशा दोन स्वरूपात केली जाते.
ओपन शस्त्रक्रिया केल्यास सात दिवस रुग्णालयात राहावे लागते. याला दुसऱ्या किंवा तिसºया दिवशीची रुग्णालयातून घरी पाठविले जाते. शिवाय त्रासही कमी असतो.