अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा १९ दिवसांनी लागला शोध, एक आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 02:15 PM2021-10-22T14:15:40+5:302021-10-22T14:17:04+5:30
आष्टी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गावातीलच इतर महिलांसोबत कांदा लागवड करण्याचे काम करते.
कडा ( बीड ) : कांदा लागवड करण्यासाठी गेल्यानंतर गायब झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा तब्बल १९ दिवसांनी शोध लागला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला एका आरोपीसह पुणे येथून ताब्यात घेतले आहे. राम अंबादास काशिद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गावातीलच इतर महिलांसोबत कांदा लागवड करण्याचे काम करते. ३ आॅक्टोबर रोजी शेतात कामासाठी गेल्यानंतर ही मुलगी घरी परतली नाही. नातेवाईकांनी तिचा शोध घेतल्यानंतरही ती मिळून आली नाही. यामुळे मुलीच्या वडिलांनी टोळीतील एक महिला, शेतात घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकावर अपहरणाचा संशय व्यक्त करून अंभोरा पोलिस ठाण्यात दि. ५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला.
दरम्यान, मोबाईल ट्रेसिंगवरून संशियत आरोपी अल्पवयीन मुलीसह पुणे जिल्ह्यात असल्याचे समजले. यावरून पोलिसांनी गुरुवारी अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीसह ताब्यात घेतले. तब्बल १९ दिवसानंतर मुलीचा शोध लागला असून याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. राम अंबादास काशिद ( २७, रा. सांगवी पाटण ) असे आरोपीचे नाव असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी सांगितले.