बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीवरून तरुणाचे अपहरण करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:03 AM2018-01-22T00:03:17+5:302018-01-22T00:03:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारुर : ग्रामपंयातच्या निवडणुकीत आपल्या गटाला पराभूत करुन स्वत:चा गट विजयी केला, म्हणून जयदेव वायबसे या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धारुर : ग्रामपंयातच्या निवडणुकीत आपल्या गटाला पराभूत करुन स्वत:चा गट विजयी केला, म्हणून जयदेव वायबसे या तरुणाचे रात्री अपहरण करुन तलावाजवळ सहा जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना केज तालुक्यातील कासारी येथे शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी धारूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
कासारी येथील ग्रामपंचायतची नुकतीच निवडणूक पार पडली. निवडणुकीवरुन दोन गटात नेहमीच धुसफूस सुरु होती. शनिवारी रात्री सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान जयदेव बालासाहेब वायबसे हा तरुण स्वत:च्या किराणा दुकानात बसला होता. यावेळी दोन मोटारसायकलवर काही जणांनी येवून जयदेव यास बाहेर बोलावले. याने ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या गटाला मतदान केले नाही. स्वत:चा गट निवडून आणला. याची गय करायची नाही असे म्हणत दुचाकीवर बसवून तलावाजवळ नेले. सहा जणांनी डी. पी. च्या वायरने त्यास बेदम मारहाण करुन जखमी केले.
या प्रकरणी जयदेव वायबसे यांच्या फिर्यादीवरुन सुशील दत्तात्रय नाईकवाडे, धनराज रावसाहेब डोईफोडे, उमेश विनायक डोईफोडे, गोविंद मधुकर डोईफोडे, दीपक प्रशांत डोईफोडे या सहा जणांविरोधात अपहरण करुन मारहाण केल्याचा गुन्हा धारूर ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी स. पो. उप नि. ए .एम. लांडगे हे तपास करीत आहेत.