नवीन शैक्षणिक धोरणात मूलभूत बदलाची क्षमता - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:11+5:302021-02-23T04:51:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : नवीन शैक्षणिक धोरण-२०२० हे भविष्यकाळाचा वेध घेणारे असून, त्यात मूल्याधारित मूलभूत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : नवीन शैक्षणिक धोरण-२०२० हे भविष्यकाळाचा वेध घेणारे असून, त्यात मूल्याधारित मूलभूत बदल घडविण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. भीष्मा रासकर यांनी आपल्या शोधनिबंध वाचनातून केले.
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील महिला महाविद्यालयात आयोजित ‘शोधनिबंध वाचन’ कार्यक्रमात प्रा. डॉ. रासकर यांनी ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कांचन परळीकर या होत्या.
नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय संस्कृती, परंपरा व मातृभाषेला महत्त्व देत ललित कलांना अधिक वाव दिला आहे. त्यामुळे विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुक्त वाव मिळणार असल्याचे प्रा. डॉ. रासकर म्हणाले. प्राचार्य डॉ. कांचन परळीकर म्हणाल्या, या शैक्षणिक धोरणाचे फायदे व नुकसान हे अंमलबजावणीनंतरच लक्षात येतील. आगामी काळ हा नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे आपण भविष्यकाळाचा वेध घेऊन त्याला सामोरे जाण्यासाठी सक्षम असले पाहिजे.
‘नवीन शैक्षणिक धोरण -२०२०’ या विषयावर झालेल्या चर्चेमध्ये प्रा. राजाभाऊ चव्हाण, प्रा. बापू घोक्षे, प्रा. डॉ. संगीता आहेर, प्रा. रामहरी काकडे, प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड व प्रा. डॉ. संजय भेदेकर यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना प्रा. डॉ. भीष्मा रासकर यांनी उत्तरे दिली. प्रास्ताविक प्रा. डॉ. कालिदास चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रामहरी काकडे यांनी केले तर प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड यांनी आभार मानले.