खरिपासाठी येणार ५९ हजार क्विंटल बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 08:22 PM2018-04-30T20:22:25+5:302018-04-30T20:24:55+5:30
आगामी हंगामात साधारण ७ लाख ५४ हजार ८०० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असून, त्यासाठी कृषी विभागाने ५९ हजार ७६३ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.
- प्रभात बुडूख
बीड : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे व जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे जिल्हा पाणीदार झाला आहे. त्यामुळे पिके देखील जोमात आली होती. आगामी हंगामात साधारण ७ लाख ५४ हजार ८०० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असून, त्यासाठी कृषी विभागाने ५९ हजार ७६३ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.
गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे नगदी पीक असणारे कापूस पिकाचे क्षेत्र ३ लाख २९ हजार ३०० हेक्टर इतके होते. मात्र, कापसावर आलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर्षी कापूस लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. खरीप हंगामासाठी कापुस बियाणांचे यावर्षी ५ हजार ९४१ क्विंटल म्हणजेच १३ लाख २० हजार २२२ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.
सोयाबीन पिकाची लागवड देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी महाबीजकडून ३० हजार क्ंिवटल तर खाजगी कंपनीकडून १३ हजार ६९९ क्विंटल असे एकूण ४३ हजार ६९९ क्विंटल सोयाबीन बियाणांची मागणी केली आहे. यामध्ये इतर खरीप पिकांचे देखील बियाणे मागवण्यात आले आहे. त्यासोबतच तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, तीळ, बाजरी या पिकांचे बियाणे देखील मागवण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी कोणती खते घ्यावीत, बियाणे घेताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांनी बियाणे व खत खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
काही पिकांवर पडलेल्या रोगांमुळे पीक नष्ट होते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे घेतलेल्या बियाणांची पावती पीक निघेपर्यंत जपून ठेवावी. जेणेकरून त्याच्याच विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी मदत होईल. तसेच किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे.
खते - बियाणे खरेदी करताना....
खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर खते व बियाणांमघ्ये शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.त्याच सोबत खरेदीची पावती, खरोदी केलेल्या बियाणे किंवा खत पाकिटाचे सील, टॅग, लॉट नंबर तपासून घ्यावे. तसेच ही पावती पीक कापणीपर्यंत जपून ठेवावी. तसेच एक्सपायरी डेट पाहूनच बियाणे व खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
अशी आहे मागणी
यावर्षी २६०,७५८ मे.टन खताची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यामध्ये युरिया ५२ हजार ५५१ मे.ट, डीएसपी १८ हजार ५६० मे.ट, एमओपी ३ हजार २४३ मे.ट, व इतर संयुक्त व मिश्र खतांचा समावेश आहे.
खात्री करून खरेदी करावी
शेतकऱ्यांनी बियाणांमधील भेसळीपासून वाचण्यासाठी बियाणांची पाकिटे व खताची गोणी सीलबंद असल्याची खात्री करावी. तसेच अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करून पावती घ्यावी. जेणेकरून फसवणूक होणार नाही.
- डी. बी. बिटके, कृषी विकास अधिकारी, जि.प.बीड