बीड जिल्ह्यात ‘पॅरोल’वर बाहेर आलेला आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:24 PM2018-04-26T23:24:12+5:302018-04-26T23:24:12+5:30
औरंगाबाद येथील कारागृहातून ‘पॅरोल’वर बाहेर आलेला खुनाच्या गुन्ह्यातील कैदी तलवाडा येथून फरार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : औरंगाबाद येथील कारागृहातून ‘पॅरोल’वर बाहेर आलेला खुनाच्या गुन्ह्यातील कैदी तलवाडा येथून फरार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
रामदास उर्फ अण्णा चिमाजी शिंदे (रा. गोंदी, जि. जालना, ह.मु. तलवाडा, ता. गेवराई) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. २००६ साली झालेल्या एका खूनप्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा भोगण्यासाठी त्याची रवानगी औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात झाली होती.
२००७ पासून तो तिथेच बंदिवान होता. शिक्षा भोगत असताना त्याला २१ फेब्रुवारी २०१८ रोजी ४५ दिवसांच्या ‘पॅरोल’वर मुक्त करण्यात आले. त्यानंतर त्याने ८ एप्रिल रोजी स्वत: कारागृहात हजर होणे आवश्यक होते. परंतु, तो कारागृहात हजर न होता फरार झाला. तो आजतागायतही कारागृहात आलेला नाही. याची माहिती मिळताच कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून फरारी अण्णा शिंदे याच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, तुरुंगरक्षक मुकुंद सोपान चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अण्णा शिंदे याच्यावर कलम २२४ अन्वये तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.