फरार आरोपीस परळी पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:33+5:302021-07-09T04:22:33+5:30
परळी : दिंद्रुड(ता. धारुर) येथे पोलिसांच्या अंगावर गाडी घालून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या फरार आरोपीच्या गुरुवारी शहरात परळी शहर ...
परळी : दिंद्रुड(ता. धारुर) येथे पोलिसांच्या अंगावर गाडी घालून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या फरार आरोपीच्या गुरुवारी शहरात परळी शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मुसक्या आवळल्या. अमित दिलीप कोमटवार ऊर्फ विकी (रा. दिंद्रुड, वय ३१) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सहा महिन्यापूर्वी दिंद्रुड पोलिसांच्या अंगावर गाडी घालून शासकीय कामात अडथळा आणून अमित दिलीप कोमटवार पळून गेला होता. सदर आरोपीचा दिंद्रुड पोलीस गेल्या सहा महिन्यापासून शोध घेत होते. परंतु आरोपी हा सहा महिन्यापासून गुंगारा देत होता. तो परळी शहरातील न्यायालय परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, परळी शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे यांनी सापळा रचून एक किलोमीटर पायी पाठलाग करून आरोपीस पकडले. आरोपीस दिंद्रुड पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने यांनी केली.