मीटर नसताना रिडींगप्रमाणे कृषिपंपाचे बिल शेतकऱ्यांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:33 AM2021-02-16T04:33:45+5:302021-02-16T04:33:45+5:30
दीपक नाईकवाडे केज : शेती पंपाला दहा तास सुरळीत वीज पुरवठा करण्याचे शासनाचे आदेश असतानाही शेती पंपासाठी सुरळीत ...
दीपक नाईकवाडे
केज : शेती पंपाला दहा तास सुरळीत वीज पुरवठा करण्याचे शासनाचे आदेश असतानाही
शेती पंपासाठी सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्यातच शेती पंपाला मीटर बसवलेले नसताना मीटर रिडींगप्रमाणे वीज बिल अंदाजपंचे तसेच न वापरलेल्या विजेचेही अवाढव्य वीजबिल दिले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातच वीजबिल हातात पडत नसल्याने शेती पंपाच्या वीज बिलाची वसुली चालू होते.
तेव्हाच वीजबिलाचा आकडा समजत असल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना
सांगितले. शेतकऱ्यांना वीज पंपाचे बिल रीडिंगप्रमाणे दिले जात असल्याचे सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
महावितरण कंपनीने शेती पंपाला दिलेल्या विजेच्या बिलाची वसुली जोरात
चालू केली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली करण्यात येत आहे. त्या शेतकऱ्यास गेल्या दोन तीन वर्षांपासून विजेचे बिलच वीज कंपनीने
दिलेले नाही. वीज जोडणी
देताना शेतकऱ्याने वापरलेल्या विजेची रिडींग घेण्यासाठी मीटर बसवणे
आवश्यक असताना वीज मीटर बसवण्यात आलेले नाहीत. मात्र, शेतकऱ्यांना
विजेचे बिल देताना मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देऊन गुत्तेदार पोसण्याचे काम महावितरण कंपनी करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. लाईनमनकडे वीजबिल मागितले तर तो केजला वीज कंपनीच्या
कार्यालयात जाऊन वीजबिल घ्या, असे सांगतो. मात्र, आम्हाला कोणत्याही
प्रकारची माहिती न देता आमच्या गावाचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे
आम्ही वीजबिल कसे भरायचे, असे बोबडेवाडी येथील शेतकरी
अविनाश बोबडे यांनी लोकमतला सांगितले. शेती पंपाला वीज मीटर बसविण्यात आलेले नाहीत. त्यातच अंदाजपंचे रिडींग नोंदवून बिले काढली जातात. मात्र, ते बिल शेतकऱ्यास दिली जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे लाखोंची वीज बिले थकली आहेत.
मीटर बसवले, रिडींगप्रमाणेच बील
केज येथील महावितरण कंपनीचे
सहायक अभियंता राजेश आंबेकर यांना विचारले असता, पूर्वी शेती पंपाचे वीजबिल हे पंपाच्या अश्वशक्तीप्रमाणे दिले जात होते.
मात्र, सध्या शेतीपंपाला विजेचे मीटर बसविण्यात आलेले असून, त्याना मीटर रिडींगप्रमाणे विजेचे बिल देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मीटर गेले कुठे?
विजेचे मीटर बसविण्यात आले तर ते गेले कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. विजेचे मीटर बसविण्यात आलेले आहेत का? याची माहिती लाईनमनला विचारली असता
त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर शेती पंपाला विजेचे मीटर बसविण्यात
आलेले नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना गुत्तेदार वीज बिलाचे वाटप करत नसल्याने त्यांना वीज बिल मिळत नसल्याचेही लाईनमनने सांगितले.