वर्धा येथील निवडणूक बंदोबस्तावर गैरहजर; परळी, पाटोद्याच्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल
By सोमनाथ खताळ | Published: April 25, 2024 12:37 PM2024-04-25T12:37:38+5:302024-04-25T12:38:46+5:30
पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वर्धा येथे २६९ पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पाठविण्यात आला होता.
बीड : लोकसभा निवडणूकीसाठी बीडमधून काही पोलिस वर्धा जिल्ह्यात बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले. परंतू परळी व पाटोदा येथील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी या बंदेाबस्ताकडे दुर्लक्ष करत गैरहजेरी लावली. त्यामुळे या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संजय दशरथ गांगुर्डे हे पाटोदा पोलिस ठाण्यात तर हरीदास शामराव गिते हे परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वर्धा येथे २६९ पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पाठविण्यात आला होता. परंतू गिते व गांगुर्डे हे दोघेही वर्धा येथे हजर झाले नाहीत. याबाबत खात्री केल्यावर या दोघांची गैरहजेरी समजली. यावर अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून जिल्हा विशेष शाखेचे पोलिस कर्मचारी शरद कोंडीराव निकम यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.