कडू कारल्याचे शेतीतून भरघोस उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:30 AM2021-01-18T04:30:11+5:302021-01-18T04:30:11+5:30
बाळासाहेब रकटाटे अंभोरा : शेतीकडे पाठ फिरवून नोकरीच्या मागे फिरणारा तरुण आपण सध्या पाहतो; परंतु आज स्पर्धेच्या युगात ...
बाळासाहेब रकटाटे
अंभोरा : शेतीकडे पाठ फिरवून नोकरीच्या मागे फिरणारा तरुण आपण सध्या पाहतो; परंतु आज स्पर्धेच्या युगात अगदी इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या तरुणांना तुटपुंज्या पगारावर नोकरी करावी लागत आहे. मात्र आधुनिक पद्धतीने शेती केली तर थोड्या शेतीतूनसुद्धा लाखोंचे उत्पादन घेऊ शकतो हे कुंबेफळ येथील दीपक मुठे नामक तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे.
आष्टी तालुक्यातील कुंबेफळ या छोट्याशा गावांमध्ये आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करून शेती करणारा तरुण दीपक मुठे आपल्या शेतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कारल्याचे उत्पादन घेत आहे. यंदाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्याने पंधरा गुंठ्यात आधुनिक पद्धतीने लागवड केली. सुरुवातीला बेड तयार केले त्यावर मल्चिंग पेपरने हे बेड पूर्णपणे झाकून घेऊन त्यावर कारल्याची लागवड केली. घरच्या घरी स्वतः पंधरा गुंठ्याला बांबू आणि तारेच्या साह्याने मांडव तयार केला. सध्याच्या स्थितीत या १५ गुंठ्यातील वेलींना कारली लगडले आहेत. या कारल्यांना अहमदनगर येथील बाजारपेठेत ५० ते ६० रुपये किलोचा दर मिळत असून रोज चार ते पाच हजार रुपयांची कारली निघत आहेत. आतापर्यंत या प्लॉटमधील ३० ते ४० हजार रुपयांची कारली विकली असून, अजून मोठ्या प्रमाणावर कारल्याचे उत्पादन निघण्याची अपेक्षा दीपकने व्यक्त केली. या कारल्याच्या प्लॉटमध्ये वेलींना मोठ्या प्रमाणावर कारली लगडली असून फुले ही मोठ्या प्रमाणात आहेत. खरे उत्पादन यापुढच्या काळात निघणार असून, ते लाखोंच्या घरात जाईल, असे दिसत आहे. नियोजन करून पिकांची निवड केली व कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्कीच शेती फायदेशीर ठरत असल्याचे दिपकने दाखवून दिले आहे.
शेतीमध्येही नोकरी इतका पैसा, कष्टाची तयारी ठेवा
आजचा तरुण शेतीव्यवसायाला दुय्यम स्थान देऊन तुटपुंज्या पगारावर शहरात नोकरी करण्याचे पसंत करतो. मात्र तोच वेळ जर आपण आपल्या शेतीत दिला तर नक्कीच शेतीमध्ये उत्पादन चांगल्या प्रकारचे निघते. त्यामुळे आजच्या तरुणांना माझे एकच आवाहन आहे की शेतीमध्ये सुद्धा नोकरी इतका पैसा मिळू शकतो. फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा.
-दीपक मुठे,तरुण शेतकरी कुंबेफळ