अपमानास्पद वागणूक; ग्रामसेवकांचा बैठकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:29 AM2018-12-07T00:29:27+5:302018-12-07T00:30:05+5:30
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांनी अपनास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत, ग्रासेवकांनी गुरुवारी बैठकीवर बहिष्कार घालत व सभात्याग केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांनी अपनास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत, ग्रासेवकांनी गुरुवारी बैठकीवर बहिष्कार घालत व सभात्याग केला. तसेच डॉ.भोकरे यांना पदावरुन हटवण्याची मागणी करत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने निवेदन दिले आहे.
गुरुवारी येथील पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात विविध कामांसंदर्भात तालुक्यातील ग्रामसेवकांची बैठक होती. यावेळी पं.स. बीडीओ शिनगारे, विस्तार अधिकारी मोरे उपस्थित होते. बैठकीत डॉ.भोकरे यांनी ग्रामसेवकांना कामांविषयी विचारणा केली. ग्रामसेवक त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत असताना काहीही न ऐकता निलंबित करण्याची तंबी दिली. त्यामुळे ग्रामसेवकांनी बैठकीवर बहिष्कार घालत पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. ग्रामपंचायतचे नियमित कामकाज, दुष्काळ निवारण, पाणी टंचाई ही कामे वगळून तपासणीसाठी दप्तर उपलब्ध न करणे, कोणतेही अहवाल न देणे अशा प्रकारे कामबंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. भोकरे यांना तात्काळ बदलण्याची मागणी करत यासाठी जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचे तालुकाध्यक्ष सखाराम काशीद यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे, भगवान तिडके, दत्ता नागरे, मधुकर शेळके, बाळासाहेब घुले, बी.एस.काटे, बाबूराव ननवरे, नारायण बडे, भाऊसाहेब मिसाळ, बी.ए.चव्हाणसह इतर ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काम असमाधानकारक असताना आंदोलन योग्य नाही : डॉ. भोकरे
नरेगामधील कामाचा वार्षिक आराखडा अद्याप पंचायत समितीला सादर केला नाही. दुष्काळी परिस्थिती व करावयाच्या उपाययोजना व उर्वरित इतर कामे यासंदर्भात सूचना करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. मात्र काम असमाधानकारक असताना देखील आंदोलनाचा पवित्रा घेणे योग्य नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे म्हणाले. शासना मार्फत सबकी योजना सबका विकास या मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील ४१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेचे वेळापत्रक आॅनलाईन करणे बाकी आहे. त्यात बीड पंचायत समिती अंतर्गत असलेल्या २० ग्रामपंचायत आहेत. ते काम पूर्ण करणे अपेक्षित होते.
१४ व्या वित्त आयोगामधून गावाला प्राप्त निधी, त्यातून केलेली कामे हे गावकऱ्यांना माहित व्हावे म्हणून प्राप्त निधी व खर्च दर्शवणारा माहिती फलक ग्रामपंचायतला लावणे आवश्यक आहे. परंतु बीड तालुक्यातील केवळ १० ग्रामपंचायतींनी असे फलक लावल्याचे डॉ. भोकरे म्हणाले.