माजलगावनंतर बीडमध्ये एसीबीची कारवाई; १० हजार लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यास बेड्या

By सोमनाथ खताळ | Published: January 25, 2024 06:58 PM2024-01-25T18:58:35+5:302024-01-25T19:00:01+5:30

तलावात गेलेल्या जमिनीसह घराचा मावेजा देण्यासाठी मागितली लाच

ACB action in Beed after Majalgaon; Woman Sub-District Officer Bharati Sagare of Land Acquisition handcuffed for taking bribe of 10,000 | माजलगावनंतर बीडमध्ये एसीबीची कारवाई; १० हजार लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यास बेड्या

माजलगावनंतर बीडमध्ये एसीबीची कारवाई; १० हजार लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यास बेड्या

बीड : तलावात गेलेल्या जमिनीचा आणि घराचा मावेजा देण्यासाठी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी १० हजार रूपयांची लाच मागितली. हीच लाच एका निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली. सलग दुसऱ्या दिवशी महसूल विभागात दोन कारवाया झाल्याने खळबळ उडाली आहे.

बीड तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेली जमीन व घर हे गावातीलच तलावात गेले होते. त्याचा ५ लाख ३८ हजार ९६५ रूपये एवढा मावेजा मिळावा, यासाठी भूसंपादन विभागाकडे अर्ज केला होता. परंतू उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी हा अर्ज निकाली काढण्यास टाळाटाळ केली. शिवाय १० हजार रूपयांची लाचही मागितली. यावर पाच दिवसांपूर्वी संबंधिताने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने गुरूवारी दुपारी भूसंपादन विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. सागरे यांनीच वसूलीसाठी नेमलेला सेवा निवृत्त मंडळा अधिकारी नवनाथ प्रभाकर सरवदे (रा.अंबाजोगाई) याच्याकडे लाच देण्यास सांगितले. लाचेची रक्कम स्विकारताच एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, प्र. अपर पोलिस अधीक्षक राजीव तळेकर, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड, सहायक सापळा अधिकारी अमोल धस, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, भारत गारदे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे, सत्यनारायण खेत्रे आदींनी केली.

सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई
माजलगावच्या उपविभागीय कार्यालयातील लिपीक वैभव जाधव व अशपाक शेख या दोघांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेताना बुधवारी पकडले होते. यातही माजलगावच्या उपविभागीय अधिकारी निलम बाफना संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यापाठोपाठ गुरूवारी लगेच बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे व खासगी इसमास पकडण्यात आले. एसीबीने सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Web Title: ACB action in Beed after Majalgaon; Woman Sub-District Officer Bharati Sagare of Land Acquisition handcuffed for taking bribe of 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.